गेल्या काही काळापासून भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना सरकार आणि कंपन्यांकडून प्रोत्साहन दिलं जात आहे. त्यामुळेच इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसत आहे. तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे लोक मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. पेट्रोलवर धावणाऱ्या कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक कारची रनिंग कॉस्ट खूप कमी असते. मात्र पेट्रोल आणि इलेक्ट्रिक दोन्ही कारची आपापली वैशिष्ट्ये आणि त्रुटी आहेत.
जर तुम्हीसुद्धा एक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि इलेक्ट्रिक कार खरेदी करायची की पेट्रोलवरची, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही तुमचा संभ्रम दूर करू. तुम्ही दहा वर्षांपर्यंत कार चालवली. पेट्रोल कार आणि इलेक्ट्रिक कारवर किती खर्च येईल, हे आम्ही सांगणार आहोत. त्यामधून तुम्हाला कुठली कार खरेदी करावी, याचा अंदाज येईल.
येथे तुलनेसाठी आपण टाटा नेक्सॉनचं उदाहरण घेऊ, कारण ही कार पेट्रोल आणि इलेक्ट्रिक अशा दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. टाटा नेक्सॉन पेट्रोलची किंमक ही ७.८० लाखांपासून सुरू होते. तर याच्या इलेक्ट्रिक व्हर्जनची किंमत १४.५० लाखांपासून सुरू होते.
पेट्रोलवरील कार १० वर्षे चालवण्यासाठी येणार खर्च पुढीलप्रमाणे आहेदररोजचा प्रवास - २० किमी मायलेज - १८.५ किमी प्रतिलिटर पेट्रोलची किंमत - १०२ रुपये वार्षिक प्रवास - ७,३०० किमी१० वर्षांमध्ये एकूण प्रवास - ७३,०० किमीप्रति किमी खर्च - ५.५५ रुपयेपेट्रोलवर वार्षिक खर्च - ४० हजार ५१५ रुपये१० वर्षांमध्ये पेट्रोलचा खर्च - ४ लाख ०५ हजार १५० रुपये
इलेक्ट्रिक कार १० वर्षे चालवण्यावरील खर्च दररोजचा प्रवास - २० किमी कारची रेंज - ३१२ किमी/चार्जइलेक्ट्रिसिटी टॅरिफ - ८ रुपये/युनिट (३० युनिट फुल चार्ज करण्यासाठी २४० रुपये)वार्षिक प्रवास - ७३०० किमी १० वर्षांमध्ये एकूण प्रवास ७३ हजार किमीप्रति किलोमीटर खर्च ०.९० रुपयेचार्जिंगमध्ये वार्षिक खर्च - ६ हजार ५४० रुपये१० वर्षांमध्ये चार्जिंगवर खर्च - ७८ हजार ४८९ रुपये
खर्चाचे आकडे पाहिल्यास पेट्रोलवर धावणाऱ्या कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार चालवण्याचा खर्च खूप कमी आहे. जर दरवर्षी ८ टक्क्यांच्या हिशेबाने पेट्रोलची किंमत वाढली, तर पेट्रोल कारला १० वर्षे चालवण्यासाठी ६ लाख ३३ हजार ६६० रुपये खर्च येईल. तर दरवर्षी ४ टक्क्यांच्या हिशोबाने विजेची किंमत वाढली तर १० वर्षांत इलेक्ट्रिक कारवर ८१ हजार ६७०.४२ रुपये खर्च येईल.
टाटा नेक्सॉन ईव्हीच्या बॅटरीवर कंपनी ८ वर्षांची गॅरंटी देत आहे. ८ वर्षांनंतर बॅटरी खराब झाल्यास नव्या बॅटरीवरील खर्च हा सुमारे ७ लाख रुपये एवढा येतो. तर जुनी झाल्यावर कारच्या किमतीमध्येही घट होते. ४ ते ५ वर्षांनंतर कारची किंमत ही ४५ ते ५० टक्क्यांपर्यंत कमी होते.
सुरुवातील इलेक्ट्र्रिक कार खरेदी करण्यात थोड्या अडचणी येऊ शकतात. कारण ही कार थोडी महाग आहे. मात्र ही कार चालवण्यासाठी येणारा खर्च हा खूप कमी आहे. भारतामध्ये चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. मात्र पर्यावरण अनुकूल असल्याने त्याला खूप पाठबळ मिळत आहे.