भारतात इलेक्ट्रीक कार आणि स्कूटरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. यामुळे गेल्या काही काळापासून नवनवीन कंपन्यांनी इलेक्ट्रीक कार (Electric Cars), स्कूटर (Electric Scooter) लाँच करण्याचा किंवा घोषणा करण्याचा सपाटाच लावला आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने ग्राहकवर्ग नव्या पर्यायाकडे वळला आहे. परंतू, एकीकडे इलेक्ट्रीक वाहनांसाठी मोठी मागणी होत असताना दुसरीकडे या वाहनांच्या किंमतीदेखील वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Electric Vehicles Price Hike)
मागणी वाढू लागल्याने इलेक्ट्रीक वाहनांच्या बॅटरीमध्ये वापरले जाणारे लिथिअम आयनची (Lithium ion Battery) मत वाढू लागली आहे. यामुळे नववर्षात पेट्रोल, डिझेलच्या वाहनांबरोबरच इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमतीदेखील वाढण्याची शक्यता आहे.
सध्या मारुती, टाटा, ऑडी सारख्या कंपन्यांनी 2022 मध्ये दरवाढ करण्याची घोषणा आताच केलेली आहे. म्हणजेच 1 जानेवारीपासून पेट्रोल, डिझेलच्या कारच्या किंमती वाढविण्यात येतील. यामागे खर्च वाढल्याचे कारण कंपन्यांनी दिले आहे. गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणावर स्कूटर, कारच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत. यामुळे जर तुम्ही पुढील काळात इलेक्ट्रीक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशावर आणखी भार पडणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच इलेक्ट्रीक कारच्या किंमती कमी होणार असल्याचे म्हणजेच पेट्रोल, डिझेल गाड्यांएवढ्या होणार असल्याचे म्हटले होते. मात्र, हे कधी होईल हे सध्या तरी कोणी सांगू शकत नाहीय. युकेच्या एनालिटिक्स आणि कंसल्टिंग फर्म Global Data ने याबाबतचा अंदाज वर्तविला आहे. कंपन्या मोठ्या प्रमाणावर त्यांच्या ईव्हींचा विस्तार करणार आहेत. परंतू, त्यांना लिथिअम आयन बॅटरींची किंमत वाढण्याचाही विचार करावा लागणार असल्याचे म्हटले आहे. 2024 पर्यंत लिथिअम आयनच्या किंमतीमध्ये 40 टक्क्यांची वाढ होऊ शकते. यामुळे भविष्यात ईव्हीच्या किंमती वाढणार आहेत.