- दिलीप फडके (विपणनशास्त्राचे अभ्यासक)विजेवर चालणाऱ्या वाहनांना अलीकडे खूप लोकप्रियता मिळते आहे. यामागे पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा कमी येणारा इंधनखर्च, उपलब्ध असणाऱ्या सुविधा अशी अनेक कारणे आहेत. पण विजेवर चालणारी वाहने ही काही आज आलेली गोष्ट नाही. रिचार्जेबल बॅटरीचा शोध लावल्यानंतर वाहनांसाठी ऊर्जा म्हणून त्यांचा वापर करण्याची कल्पना मूळ धरायला लागली आणि १८८१ मध्ये गुस्ताव्ह ट्रौवे यांनी पहिल्या इलेक्ट्रिक वाहनाची चाचणी केली. पुढे इंग्लिश शास्त्रज्ञ थॉमस पार्कर यांनी इलेक्ट्रिक कार बनवली. त्याची एलवेल-पार्कर कंपनी इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनात सुरुवातीच्या काळात अग्रेसर होती.
१८९० च्या उत्तरार्धात आणि १९०० च्या सुरुवातीच्या काळात मोटार वाहनांमध्ये इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या टॅक्सीज् उपलब्ध झाल्या. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजामुळे त्यांना लवकरच ‘हमिंगबर्ड्स’ असे टोपणनाव देण्यात आले. सुरुवातीच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांचे अनेक फायदे लक्षात येत होते. पेट्रोल कारसारखे व्हायब्रेशन, वास आणि आवाज येत नव्हता. त्यांना गिअर बदलण्याचीदेखील गरज नव्हती. इंजिन सुरू करण्यासाठी हँडल मारावे लागत नव्हते. साहजिकच इलेक्ट्रिक कार्स शहरी कार म्हणून ग्राहकांमध्ये लोकप्रिय झाल्या.
पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांच्या इंजिनामध्ये पुढच्या काळात खूप सुधारणा झाल्या आणि त्या गाड्या वापरणे अधिक सोयीचे आहे असे लक्षात आले. १९१० च्या दशकात बहुतेक इलेक्ट्रिक कार निर्मात्यांनी उत्पादन बंद केले. इलेक्ट्रिक वाहने काही विशिष्ट उपयोगासाठी लोकप्रिय झाली. १९२० च्या दशकापर्यंत, इलेक्ट्रिक मोटारींची लोकप्रियता संपली होती.
आपण पाहतो आहोत ती जाहिरात बेकर इलेक्ट्रिक्सची १९०६ सालच्या ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीजमधली आहे. बेकर इलेक्ट्रिक कार ही पहिल्या व्हाइट हाऊस कारच्या ताफ्याचा भाग होती. बेकर इलेक्ट्रिक कार खूपच आलिशान असे आणि त्याची किंमत $२८०० होती. १९०३ मध्ये सयामच्या राजाने सियामचा बेकर इलेक्ट्रिक विकत घेतली होती. पुढे डेट्रॉईट इलेक्ट्रिकने बेकरला मागे टाकले. तीसच्या दशकात पाहता पाहता इलेक्ट्रिक कार्स मागे पडत गेल्या आणि त्या पुन्हा आल्या त्या थेट शंभर वर्षांनी. हा प्रवास गमतीचा आहे. नाही का?(pdilip_nsk@yahoo.com)