ईव्हीमध्ये सर्वात काय महाग असेल तर ती बॅटरी आहे. कारण तोच तिचा आत्मा आहे. इंधनाच्या कारमध्ये इंधन आपण बाहेरून टाकू शकतो, परंतु बॅटरी आपण बदलू शकत नाही. ती कंपनीच तयार करते आणि तेच बदलू शकतात. अशावेळी कंपन्या सांगतील तो दर आणि कंपन्या सांगतील ती रेंज असाच प्रकार असतो. परंतु आता दर आणि रेंजच्या बाबतीत बरेचकाही बदलण्याची शक्यता आहे.
एमआयटीच्या संशोधकांनी एक बॅटरीचे घटक तयार केले आहेत. हे घटक बॅटरीला जास्त रेंज आणि टिकाऊ बनवू शकतात. तसेच बॅटरीची किंमतही कमी करू शकतात. सध्याच्या बॅटरीमध्ये लिथिअम आयन वापरले जाते. नव्या बॅटरीमध्ये लिथिअम आयनसोबत कोबाल्ट किंवा निकेलऐवजी कार्बनयुक्त पदार्थांवर आधारित कॅथोड वापरण्यात येणार आहे. कोबाल्ट हा खूप महागही आहे.
संशोधकांच्या दाव्यानुसार कोबाल्ट-युक्त बॅटरींपेक्षा खूपच कमी खर्चात तयार होणारी ही सामग्री कोबाल्ट बॅटरींप्रमाणेच वीज वहन करू शकते. ही बॅटरी कोबाल्ट बॅटरीपेक्षा अधिक वेगाने चार्ज होऊ शकते. साठवण क्षमता पारंपारिक कोबाल्ट-युक्त बॅटरीएवढीच असल्याचे या सामग्रीच्या चाचण्यांमध्ये आढळून आले आहे.
कोबाल्टमध्ये अनेक कमतरता आहेत. पर्यायी बॅटरी सामग्री विकसित करण्यासाठी बरेच संशोधन केले गेले आहे. आणखी एक पर्याय म्हणजे लिथियम-लोह-फॉस्फेट आहे. या मिश्रणाच्या बॅटरीचा वापर काही कार कंपन्या करू लागल्या आहेत. परंतु या बॅटरींमध्ये उर्जेचे घनत्व हे कोबाल्टपेक्षा निम्म्याने कमी आहे. यामुळे अन्य पर्याय आल्यास त्याचा फायदा इलेक्ट्रीक वाहनांना होणार आहे.