Electric Car : मध्य प्रदेशातील विद्यार्थ्याने बनवली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, अवघ्या 30 रुपयांत धावते 185 किमी!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 10:14 PM2021-12-04T22:14:42+5:302021-12-04T22:15:31+5:30
Engineering Student Himanshu Bhai Patel : इंजिनीअरिंगचा विद्यार्थी हिमांशू भाई पटेल याचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक कार अवघ्या 30 रुपयांमध्ये 185 किमीपर्यंतचे अंतर कापू शकते. कारचा टॉप स्पीड 50 किलोमीटर प्रति तास आहे.
नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एका इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने इलेक्ट्रिक कार बनवली आहे. विशेष म्हणजे, ही विंटेज दिसणारी इलेक्ट्रिक कार वाहन उत्पादकांच्या इलेक्ट्रिक कारपेक्षा खूपच स्वस्त आहे.
या कारमध्ये ड्रायव्हरसह 5 लोक बसू शकते आणि दिसायलाही खूपच आकर्षक आहे. ही कार एकदा फुल चार्ज केल्यानंतर 185 किमी धावते. आणखी एक खास वैशिष्ट म्हणजे ही कार चालू असतानाच तिची बॅटरी स्वतः चार्ज होऊ लागते.
इंजिनीअरिंगचा विद्यार्थी हिमांशू भाई पटेल याचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक कार अवघ्या 30 रुपयांमध्ये 185 किमीपर्यंतचे अंतर कापू शकते. कारचा टॉप स्पीड 50 किलोमीटर प्रति तास आहे.
हिमांशू पटेलने 5 महिन्यांच्या मेहनतीनंतर ही कार तयार केली आहे. हिमांशू पटेल हा गुजरातमधील गांधीनगर येथे शिकत आहे आणि तो सागर जिल्ह्यातील मकरोनिया येथील रहिवासी आहेत.
कार बनवण्यासाठी किती खर्च आला?
देशातील विविध वाहन उत्पादक कंपन्यांनी अनेक इलेक्ट्रिक कार बाजारात आणल्या आहेत. हिमांशू पटेलने बनवलेली ही कार सध्या बाजारात असलेल्या इतर कारच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. ही कार बनवण्यासाठी 2 लाख रुपये खर्च आला आहे, असे हिमांशू पटेल याने सांगितले.
बॅटरी आणि चार्जिंग
या इलेक्ट्रिक कारची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 4 तास लागतात. या इलेक्ट्रिक कारची बॅटरी विजेने चार्ज करण्यासाठी 30 रुपये खर्च येतो. विशेष म्हणजे रिमोट कंट्रोलने कार सुरू आणि थांबवता येते.
कारमधील फीचर्स
कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्पीड मीटर, बॅटरी पॉवर मीटर, फास्ट चार्जरसह अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. कार रिव्हर्स करण्यासाठी बटण देण्यात आले आहे. सेफ्टी फीचर म्हणून यामध्ये चोरीपासून वाचवण्यासाठी अलार्म देखील लावण्यात आला आहे. शॉर्टसर्किट झाल्यास, कारमध्ये बसवलेले एमसीबी ट्रिप होईल, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार टाळला जाऊ शकतो.