EV Kinetic Luna: देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. एकीकडे नवीन स्टार्टअप्स EV सेगमेंटमध्ये उतरत आहेत, तर दुसरीकडे जुन्या दिग्गज कंपन्याही पुनरागमण करण्यासाठी सज्ज आहेत. ऐंशी-नव्वदच्या दशकातील लुना तुम्हाला आठवत असेलच, ही लुना पुन्हा एकदा भारतीय रस्त्यांवर धावताना दिसणार आहे. पण, यावेळेस ही नवीन इलेक्ट्रिक अवतारात दिसेल. कंपनीच्या सीईओ सुलभा फिरोदिया मोटवानी यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.
सुलभा फिरोदिया मोटवानी यांनी ट्विटरवर तिच्या वडिलांचा जुना फोटो आणि लुनाचा एक विंटेज व्हिडिओ पोस्ट केला आहे. यासोबतच E-Luna येत असल्याचे सांगितले आहे. फिरोदिया यांच्या पोस्टने आगामी पहिल्या मॉडेलचे नाव स्पष्ट झाले आहे. या नावासह कंपनी पुन्हा मार्केटमध्ये आपले नाव करण्यासाठी सज्ज आहे. विशेष म्हणजे, बजाज ऑटोने जुन्या नावासह त्यांची प्रसिद्ध स्कूटर चेतकदेखील इलेक्ट्रिक अवतारात लॉन्च केली आहे. याशिवाय एलएमएल यावर्षी इलेक्ट्रिक स्टार स्कूटर सादर करण्याच्या तयारीत आहे.
कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन्स द्वारे लॉन्च होणारी इलेक्ट्रिक लुना किंवा ई लुना हे पहिले मॉडेल असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने चेसिस आणि इतर घटकांचे उत्पादन देखील सुरू केले आहे. सुरुवातीला कंपनीने दरमहा 5,000 युनिट्सचे उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, जे कालांतराने आणखी वाढेल. कायनेटिक त्यांच्या इलेक्ट्रिक लुनासाठी स्वतंत्र असेंब्ली लाइन सेट करत आहे. कंपनी महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये ई लुनाचे उत्पादन करणार आहे.
भारतातील पहिली मोपेड
कायनेटिक लूना त्या काळातील खूप प्रसिद्ध गाडी होती. 1972 मध्ये कायनेटिक इंजिनियरिंगने ही लॉन्च केली होती. ही देशातील पहिली मोपेड होती. याची इंजिन क्षमता फक्त 50 सीसी होती. नंतर ती टीएफआर, डबल प्लस, विंग्स, मॅग्नम आणि सुपर या विविध प्रकारांमध्ये सादर केली गेली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही पहिल्यांदा लॉन्च केली, तेव्हा याची किंमत फक्त 2,000 रुपये होती.