नाशिक: तुम्ही इलेक्ट्रीक वाहनांना आग लागल्याच्या अनेक घटना पाहिल्या असतील. अशाच प्रकारची एक घटना नाशिकजवळ घडली आहे. पण, ही घटना सामान्य घटनेपेक्षा फार मोठी आहे. नाशिकजवळील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन जाणाऱ्या कंटेनरमध्ये भीषण आग लागून 20 इलेक्ट्रिक वाहने जळून खाक झाले, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
40 पैकी 20 स्कूटर जळून खाकघटना अकरा एप्रिल रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. पाथर्डी फाटा येथील एका हॉटेलजवळ दुपारी 4.15 च्या सुमारास आगीची घटना घडली. सिडको आणि अंबड एमआयडीसी केंद्रांच्या अग्निशमन दलाने तासाभरात आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत कंटेनरमधून नेण्यात येणाऱ्या जितेंद्र इलेक्ट्रिक या कंपनीच्या 40 इलेक्ट्रिक स्कूटरपैकी 20 स्कूटर जळून खाक झाल्या. कंटेनरच्या बाहेरील बाजूस कुठलीही आग नव्हती, त्यामुळे आग आतठेवलेल्या स्कूटरलाच लागल्याचे निष्पन्न झाले आहे. पण अद्याप आगीचे कारण समोर आले नाही.
भारतात आगीच्या अनेक घटनाभारतातील इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याची ही पाचवी घटना आहे. 26 मार्च रोजी पुण्यात ओला इलेक्ट्रिक S1 प्रो स्कूटरला आग लागली होती. त्याच दिवशी तामिळनाडूतील वेल्लोरमध्ये आणखी एका इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागली आणि त्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. 28 मार्च रोजी तामिळनाडूमध्ये आणखी एका इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागली, त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी चेन्नईमध्ये दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर जळाली.