नवी दिल्ली : भारताबरोबरच परदेशातही इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला आहे, मात्र भारतात सध्या मोजकीच इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर दिसतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पेट्रोल-डिझेल वाहनांच्या किमतींपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती काही प्रमाणात जास्त आहेत. याबाबत बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, भारतातील हे वातावरण पूर्णपणे बदलण्यासाठी फक्त एकच इलेक्ट्रिक वाहनांच्या क्रांतीची प्रतिक्षा आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांइतकीच होईल. असे झाले तर पेट्रोल-डिझेल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती अवघ्या 2 वर्षात समान होऊ शकतात.
ऑनलाइन आयोजित केलेल्या इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, "इलेक्ट्रिक वाहनांची किंमत जास्त आहे कारण त्यांची संख्या कमी आहे. पण भारत इलेक्ट्रिक वाहनांच्या क्रांतीची वाट पाहत आहे आणि 250 हून अधिक स्टार्टअप्स भारतात परवडणारे इलेक्ट्रिक वाहनांचे तंत्रज्ञान आणण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. यानंतर मोठमोठ्या वाहन निर्मात्यांनीही परवडणारी इलेक्ट्रिक वाहने आणण्यास सुरुवात केली असून स्पर्धा वाढू लागली आहे. लवकरच भारत इलेक्ट्रिक वाहनांसाठी सर्वात मोठी बाजारपेठ बनेल. देशातील इलेक्ट्रिक वाहनांसाठी सध्याच्या सुविधा आणि चार्जिंग सिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याचे काम पुढील 5 वर्षांत केले जाईल."
बाजारासाठी चांगले संकेतदुचाकी असो, तीनचाकी असो किंवा चारचाकी असो, इलेक्ट्रिक वाहनांमधील स्पर्धा झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे आणि हे बाजारासाठी चांगले संकेत आहेत. तसेच आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. अधिक इलेक्ट्रिक वाहने म्हणजे कमी प्रदूषण आणि चांगले आरोग्य. यासाठी जगभरात खूप प्रयत्न केले जात आहेत आणि COP26 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2070 पर्यंत भारताला शून्य कार्बन उत्सर्जन राष्ट्र बनवण्याचे आश्वासन दिले आहे. इलेक्ट्रिक वाहनांबद्दल बोलण्यासोबतच गडकरींनी वाहन स्क्रॅपेज धोरण आणि त्याचे फायदे यावरही भर दिला आहे.