लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : मागील दोन ते तीन महिन्यांत देशातील प्रमुख इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपन्या आपल्या वाहनांच्या किमती २० ते २५ हजार रुपयांनी (२५ टक्के) स्वस्त करत आहेत. प्रवेश पातळीवरील मॉडेलांच्या किमती सुमारे १५ ते १७ टक्के कमी झाल्या आहेत.ईव्ही दुचाकी किफायतशीर बनवून विक्रीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कंपन्यांनी किमती कमी केल्या आहेत. ईव्हीमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटऱ्यांच्या किमती सातत्याने कमी होत आहेत. त्याचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय कंपन्या घेत आहेत. त्यामुळे वाहनांच्या किमती कमी झाल्या आहेत.
पर्यायी बॅटऱ्याही उपलब्धइलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणाऱ्या लिथियम आयर्न बॅटऱ्यांना पर्याय म्हणून अन्य बॅटऱ्याही विकसित होत आहेत. त्यामुळे लिथियम आयन बॅटऱ्यांच्या किमती उतरण्यास मदत झाली आहे.
पेट्रोल दुचाकीएवढ्या होतील किमती, तज्ज्ञांचा दावा‘फाडा’चे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया यांनी सांगितले की, अनेक पेट्रोल दुचाकी उत्पादक कंपन्या ई-दुचाकी क्षेत्रात उतरल्या आहेत. आपल्या मॉडेलांची संख्या ते वाढवीत आहेत. सध्या त्यांची हिस्सेदारी सुमारे ५ टक्के आहे. दोन ते तीन वर्षांत ती अनेक पटीने वाढेल. त्याबरोबर ई-दुचाकींच्या किमती पेट्रोल दुचाकींच्या पातळीवर येतील.
का स्वस्त होत आहेत बॅटऱ्या?ईव्ही बॅटरी तज्ज्ञ आणि ईव्ही ऊर्जाचे सीईओ संयोग तिवारी यांनी सांगितले की, भारतासह जगात अनेक देशांत लिथियमचे साठे सापडले आहेत. त्यामुळे ईव्ही बॅटरी निर्मिती क्षेत्रातील चीनच्या वर्चस्वास धक्का बसला आहे. त्यामुळे बॅटऱ्यांच्या किमती कमी होत आहेत.
साठा निकाली काढण्याची घाईसूत्रांनी सांगितले की, ई-दुचाकी किमती कमी होण्यामागे आणखी एक कारण म्हणजे मार्चअखेरपर्यंत वाहनांचे साठे कमी करण्याची कंपन्यांची घाई. साठे निकाली काढण्यासाठी कंपन्यांनी किमती कमी केल्या आहेत.