पावसाळा आला की कार, ट्रक, टेम्पो चालकांना एक त्रास नेहमी सतावत असतो, तो म्हणजे समोरील काचेवर धुके तयार होऊ लागते. एसी लावला तर बाहेरच्या बाजुने आणि एसी नाही लावला तर आतल्या बाजुने. अनेकजण अनेकप्रकारचे प्रयत्न करतात. काही जण सोशल मीडियावरही विचारतात, की काय करावे. या फॉगमुळे समोरचे काही दिसत नाही व यामुळे अपघात होण्याची शक्यता असते.
कारच्या काचांवर धूर बनण्याची समस्या एका मिनिटात दूर केली जाऊ शकते. जर आतून काचेवर धुके जमू लागले तर लगेचच एसी चालू करावा. जेव्हा वातावरणातील आर्द्रता खूप जास्त असते तेव्हा ही समस्या उद्भवते. यावेळी एखादा मऊ कापडाचा सुका फडका सोबत ठेवावा. तो स्वच्छ असेल तर हे धुके पुसता येते व काचेवर पाण्याचे डागही राहत नाहीत.
जर खिडक्यांवर धुके जमले तर एसी व्हेंट्स तिकडे वळवा, जर समोरील काचेवर धुके जमले असेल तर काचेवर एसीचा फ्लो वाढवा. जेणेकरून ही थंड हवा काचेवरील धुके क्षणात घालवून टाकेल. तरीही काचेवर धुरकट दिसत असेल तर स्वच्छ कपडा घ्या आणि हाताचा काचेला स्पर्श न करता पुसा. यामुळे काच एकदम स्वच्छ होते व पुढील दिसायला लागते.
बाहेरून फॉग जमा झाला तर काय...जर काचेवर बाहेरून फॉग जमा झाला तर काय करायचे, असा प्रश्न सतावत असेल तर कारचा एसी बंद करून ब्लोअर सुरु करावा. ही काच बाहेरील वातावरणापेक्षा जास्त थंड झाल्याने बाहेरून धुके पकडू लागली होती. ती गरम झाली की लगेचच हे धुके गायब होते. कारवरील धुके घालविण्याचे बाजारातही काही उपाय आहेत. एक विशिष्ट प्रकारचे लिक्विड मिळते, ते काचेवर लावून काच धुतल्याने फॉग जमत नाही. तसेच काचेवर पाणी न थांबून राहण्यासाठी देखील टूथपेस्ट, बटाटा आदी उपाय करता येतात.