लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सध्याच्या देशव्यापी ‘लॉकडाउन’च्या काळात मुदत संपत असलेल्या वाहनविमा व आरोग्यविम्याच्या पॉलिसींना येत्या २१ एप्रिलपर्यंत सरसकट मुदतवाढ देण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने गुरुवारी कोट्यवधी विमाधारकांना मोठा दिलासा दिला.ताज्या आकडेवारीनुसार देशात सध्या २३ कोटी वाहनविम्याच्या व ४० कोटी आरोग्यविम्याच्या पॉलिसी आहेत. त्यांच्यापैकी ज्यांच्या पॉलिसींची मुदत ‘लॉकडाउन’च्या काळात संपत असेल त्यांना पॉलिसीचे नूतनीकरण न करताही आहेच त्याच पॉलिसीवर २१ एप्रिलपर्यंत विम्याचे संरक्षण सुरू राहील.भारतीय विमा कायद्याच्या कलम ६४ व्हीबी अन्वये विम्याची पॉलिसी हप्ता भरल्यावरच लागू होते व ती ठरलेल्या काळापुरतीच सुरू राहाते. पॉलिसीधारकाने विम्याचा हप्ता भरण्याआधीच त्याला विमा संरक्षण देण्याची कायद्यात तरतूद नाही; परंतु सध्याच्या ‘लॉकडाउन’च्या काळात मुदत संपलेल्या अनेक पॉलिसींचे नूतनीकरण होऊ शकणार नाही किंवा इच्छा असूनही लोकांना नवी पॉलिसी घेता येणार नाही, हे लक्षात घेऊन केंद्रीय वित्त मंत्रालयाने एक अधिसूचना काढून विमा कायद्यातील हे बंधन शिथिल केले आहे.
वाहन, आरोग्य विम्याच्या पॉलिसींना मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 5:42 AM