रतन टाटा आज देशाच्या सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहेत. त्यांना टाटा हे नाव जरूर मिळाले परंतू तिथपर्यंत पोहोचण्यासाठी टाटांना खूप त्रास सहन करावा लागला. लहानपणीच कौटुंबिक समस्यांनी टाटांना ग्रासले होते. तेव्हा त्यांची आजी त्यांचा आधार बनली होती. 1948 मध्ये टाटा 10 वर्षांचे असतानाचा त्यांचे आईवडील वेगळे झाले. रतनजी यांची विधवा आजी नवजीबाई यांनी त्यांना दत्तक घेतले. आजीनेच रतन टाटा आणि त्यांच्या भावाला लहानाचे मोठे केले. कारण टाटा यांच्या आईने दुसरे लग्न केले होते. याचा त्रास टाटांना त्यांच्या शालेय जिवनातही भोगावा लागला.
घर फुटले की त्याचा सर्वात जास्त त्रास मुलांना होतो. तसाच प्रकार टाटांच्याबाबतीत घडला. मात्र, टाटांना त्यांच्या आजीने दोन शब्दांचा कानमंत्र दिला होता, यामुळे आजही टाटा एवढे शांत वागतात. या कानमंत्राने टाटा यांचे आयुष्यच बदलून गेले.
'ह्यूमंस ऑफ बॉम्बे' शी बोलसताना टाटा यांनीच याबाबत सांगितले आहे. ''तसे तर माझे लहानपण खुशीत गेले. मात्र, जसजसे मी आणि माझा भाऊ मोठे होत गेलो आम्हाला रॅगिंग आणि वैयक्तीक संकटांचा सामना करावा लागला होता. आमच्या आईवडिलांनी घटस्फोट घेतला. ही गोष्ट आजच्यासारखी तेव्हा सामान्य नव्हती. मात्र, आम्हाला आमच्या आजीने सांभाळले. जेव्हा माझ्या आईचे दुसरे लग्न झाले तेव्हा शाळेतील मुलांनी आमच्याबाबत बरेच उलट सुलट बोलायला सुरुवात केली होती. मात्र, आजीने आम्हाला यावर कोणतीही किंमत मोजून मर्यादा ठेव असा सल्ला दिला होता. ती गोष्ट आजही माझ्यासोबत आहे, असे टाटा यांनी सांगितले.
आयुष्यभर आजीची शिकवण कामी आली...टाटांनी पुढे सांगितले, आजीच्या या गोष्टीवरून आम्ही अशा टोमण्यांकडे दुर्लक्ष केले ज्यावरून आम्ही कदाचित हाणामाऱ्या केल्या असत्या. मला आजही आठवतेय दुसऱ्या विश्वयुद्धानंतर आजी मला आणि माझ्या भावाला घेऊन उन्ह्याळाच्या सुटीत लंडनला घेऊन गेली होती. तिथेही मी जिवनमुल्य शिकलो. आजी सांगायची 'असे बोलू नका', 'या गोष्टीवर शांत रहा' आणि तेव्हापासूनच आमच्या मनात सर्वात वर मर्यादा ही गोष्ट घर करून गेली. ती आजही तशीच आहे.