गेल्या काही दिवसांमध्ये देशात इलेक्ट्रीक दुचाकींना आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. यामध्ये काही जणांना आपला जीव देखील गमवावा लागला होता. यानंतर सरकारदेखील अॅक्शनमोडमध्ये आलं होतं आणि एक समितीही स्थापन करण्याचे निर्देश दिले होतं. परंतु त्यानंतर आता काही माध्यमांकडून सरकारन इलेक्ट्रीक दुचाकींचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना नव्या गाड्या लाँच न करण्याचे निर्देश दिल्याचं सांगण्यात आलं होतं. सरकारनं आता यावर स्पष्टीकरण दिलं आहे. सरकारनं अशाप्रकारचे कोणतेही आदेश दिले नसल्याचं स्पष्ट केलंय.
इलेक्ट्रीक दुचाकींमध्ये आग लागण्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर सरकारनं उत्पादकांना नव्या इलेक्ट्रीक दुचाकी लाँच न करण्याचा, तसंच ज्या कंपन्यांच्या गाड्यांमध्ये आग लागल्याची घटना घडली नाही, त्यांनीदेखील नव्या दुचाकी लाँच न करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं होतं. यावर सरकारनं स्पष्टीकरण देत हे वृत्त निराधार असल्याचं म्हटलं आहे.