पुण्यात अवाढव्य साम्राज्य असलेली टाटा मोटर्स पुन्हा एकदा वाट वाकडी करून महाराष्ट्राबाहेर नशीब आजमावणार आहे. पश्चिम बंगालमध्ये रतन टाटांनी पाहिलेले सामान्यांची कार नॅनोचा बांधून झालेला प्रकल्प ममता बॅनर्जींच्या आडमुठ्या भूमिकेमुळे गुजरातमध्ये हलवावा लागला होता. नॅनो रस्त्यावर आली खरी परंतु सानंद येथेही नॅनोचा प्रकल्प फेल गेला होता. टाटाला नॅनो प्रकल्प बंद करावा लागला होता. आता पुन्हा एकदा टाटा महाराष्ट्राबाहेर मोठी गुंतवणूक करणार आहे.
टाटा मोटर्स तामिळनाडूमध्ये ९००० कोटींची गुंतवणूक करून वाहन निर्मिती कारखाना उभारणार आहे. टाटा मोटर्सने बुधवारी तामिळनाडू सरकारसोबत करार केला आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी टाटा मोटर्सच्या प्रकल्पामुळे राज्यात ५००० नोकऱ्या निर्माण होणार असून राज्य ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचे हब होणार असल्याचे म्हटले आहे.
तामिळनाडूमध्ये व्हिएतनामची बडी इलेक्ट्रीक वाहन कंपनी १६००० कोटी रुपये गुंतविणार आहे. विनफास्टनंतर टाटासोबत डील झाल्याने तामिळनाडू सरकार फॉर्ममध्ये आले आहे. दोन महिन्यांच्या आत दोन मोठ्या डील झाल्या आहेत. टाटाच्या या डीलचा परिणाम आज शेअर बाजारावर दिसू शकतो. Tata Motors Share मध्ये गेल्या महिन्यात १३३ टक्क्यांची वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांचा पैसा टाटाने एका महिन्यात अडीज पट केला आहे.
गेल्या काही वर्षांत टाटाच्या पॅसेंजर व्हेईकलच्या खपात मोठी वाढ झाली आहे. यामुळे टाटा विस्तार करत आहे. २०२२ मध्ये टाटाने फोर्डचा सानंदचा प्रकल्प ताब्यात घेतला होता. टाटाच्या इलेक्ट्रीक वाहनांना मोठी मागणी आहे. तसेच फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगच्या कार टाटाकडे बहुतांश असल्याने त्यांची मागणीही वाढली आहे. अशातच उत्पादन वाढविण्यासाठी टाटाला विस्तार करणे गरजेचे बनले आहे.