फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग कारची यादीच असणाऱ्या टाटा मोटर्सने अखेर फोर्डसोबत डील पूर्णत्वास नेली आहे. एकेकाळी टाटा मोटर्स खरेदी करणे नाकारणाऱ्या फोर्डवर टाटाने दुसऱ्यांदा मेहरबानी केली आहे. Ford India चा साणंदमधील प्रकल्प टाटा पूर्णपणे ताब्यात घेणार आहे.
१० जानेवारीला फोर्डचा हा प्रकल्प टाटा आपल्या अधिपत्याखाली सुरु करणार आहे. या प्रकल्पात टाटा इलेक्ट्रीक गाड्या बनविणार आहे. यावर्षीच्या ऑगस्टमध्ये कंपनीने याची घोषणा केली होती. टाटा पॅसेंजर इलेक्ट्रीक मोबिलिटी लिमिटेड (टीपीईएमएल) गुजरातमध्ये फोर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा साणंदमधील प्रकल्पाचे अधिग्रहण करणार आहे. यासाठी टाटाने 725.7 कोटी रुपये मोजले आहेत.
टाटा हा प्लांट पूर्णपणे स्वतःच्या शैलीने चालवणार आहे. जमिनीपासून ते सर्व मशिन्स या संपादनात समाविष्ट आहेत. टाटा मोटर्सने म्हटले आहे की, व्यवहारासाठी आवश्यक असलेल्या पूर्व शर्तींच्या पूर्ततेच्या अधीन, संबंधित सरकारी मंजूरी मिळविण्यासह, दोन्ही कंपन्यांनी 10 जानेवारी 2023 रोजी व्यवहार पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. फोर्ड इंडिया प्लांटमधील पात्र कर्मचाऱ्यांना टाटा पॅसेंजरमध्ये सामील होण्याची ऑफर दिली आहे. कर्मचार्यांना टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडमध्ये अटी, शर्ती आणि सेवेच्या फायद्यांवर नोकरीची ऑफर दिली आहे.
फोर्ड इंडियाच्या अनेक कर्मचाऱ्यांना टाटा मोटर्सने ऑफर लेटरही दिली आहेत, ज्या कर्मचाऱ्यांना ऑफर लेटर मिळाली आहेत ते 10 जानेवारी 2023 पासून TPEML चे कर्मचारी होतील, असेही कंपनीने म्हटले आहे.