उष्णता वाढू लागताच गाड्यांना आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. इलेक्ट्रीक वाहनांना वरचेवर आगी लागू लागल्या आहेत. यातच आता एमजी हेक्टरच्या शोरुमला आग लागल्याची घटना समोर आली आहे. लखनऊच्या चिनहटमध्ये एका कारच्या शोरुमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जळून खाक झाल्या आहेत.
कार शोरुमला आग लागल्याचे समजताच आतील कर्मचाऱ्यांनी आणि ग्राहकांनी बाहेर धाव घेतली. शोरुमच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. अचानक बंदिस्त शोरुममध्ये धुराचे वातावरण तयार झाले. यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
आग लागल्याने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर काही लोक अडकले होते. त्यांना फायर ब्रिगेडने खाली उतरविले. अग्निशमनच्या 11 गाड्या घटनास्थळी आल्या होत्या. सुमारे दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आग विझवण्यासाठी स्टीयर आणि हायड्रोलिक मशीनचाही वापर करण्यात आला. सऱ्या मजल्यावरील 4 ते 5 वाहने जळाली, तसेच कार्यालयात ठेवलेले सामानही जळून खाक झाले.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, शोरूममध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आधी सेंट्रल एअर कंडिशनमध्ये (एसी) शॉर्ट सर्किट झाले आणि त्यानंतर धूर निघू लागला. थोड्याच वेळात आगीत रुपांतर झाले.