वाहनांवर जातीवाचक नाव लिहून रुबाब दाखविणाऱ्यांची आता खैर राहिलेली नाही. महाराष्ट्रातील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून पंतप्रधान कार्यायलाने उत्तर प्रदेशमध्ये अशा जातीसूचक नावे असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी लखनऊमध्ये पहिली पावती फाडण्यात आली आहे.
कानपूरच्या राहणाऱ्या आशिष सक्सेना यांच्या वाहनाच्या मागील काचेवर 'सक्सेना जी' लिहिण्यात आले होते. झाले असे की, पोलिसांनी नेहमी प्रमाणे तपासणीसाठी गाडीला हात दाखविला. यावेळी पोलिसांनी कारच्या चालकाकडे वाहनाची कागदपत्रे मागविली. कागदपत्रे पाहिल्यानंतर कारच्या मागे जाऊन पाहिले तर मागच्या काचेवर 'सक्सेना जी' लिहिलेले दिसले. पोलिसांनी नुकताच आदेश आला होता, लगेच चलनही फाडत कार चालकाला जोरदार दणका दिला. हिंडोला पोलिसांनी ही कारवाई केली.
मुंबईतून झालेली तक्रार...डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला मुंबईच्या हर्षल प्रभू यांनी आयजीआरएसवर पंतप्रधानांना पत्र पाठवून उत्तर प्रदेशमधील वाहनांवर जातीसूचक किंवा धर्म सांगणारे स्टीकर लावले जात असल्याचा तक्रार केली होती. अशा प्रकारचे स्टीकर लावून सामाजिक ऐक्य आणि कायद्यांचा भंग केल्याचे पंतप्रधान कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. यानंतर पीएमओने लगेचच उत्तर प्रदेश पोलिसांना यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
कालच आदेश आले...दुचाकी किंवा चारचाकी वाहनांच्या काचांवर जातीवाचक नावाचा उल्लेख केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, गाडीच्या नंबरप्लेटवरही नावाचा उल्लेख केल्यास संबधित गाडीमालकावर कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात अतिरिक्त परिवहन आयुक्त मुकेश चंद्र यांनी राज्यातील सर्व आरटीओंना पत्र पाठवले आहे. तसेच, अशा वाहनांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
नावाच्या नंबरसाठी लाखो मोजतात ग्राहक
वाहनांच्या नंबर प्लेटवर अनेकदा भाऊ, दादा, नाना, काका अशी नावे दिसतात. ही सर्व किमया फॅन्सी नंबरची असते. अशी नंबर प्लेट लावणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यामुळे गेल्या काही वर्षांत अशा नंबर प्लेटचे प्रमाण कमी झाले असले तरी फॅन्सी नंबर घेण्याकडे वाहनधारकांचा ओढा आजही कायम आहे. यासाठी कोणी श्रद्धेपाटी, तर कोणी हौसेपोटी १५ हजारांपासून २ लाखांपर्यंतची रक्कम मोजत आहेत. काही दिवसांपूर्वीच १११ या क्रमांकासाठी सर्वाधिक २ लाख १० हजार रुपये मोजण्यात आले आहेत. तसेच, नाव किंवा जातीचं नाव लिहिता येईल, अशा नंबरप्लेटसाठीही पैसे मोजले जातात. त्या पार्श्वभूमीवर युपी सरकारने हा निर्णय लागू केला आहे.
विना नंबरप्लेट वाहन दिल्यास कारवाई
महाराष्ट्रात १ एप्रिल २०१९ पासून नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट’ ची सक्ती करण्यात आली. परंतु पूर्वी वाहनांना ‘एचएसआरपी’ प्लेट लागेपर्यंत १५-२० दिवसांचा कालावधी लागायचा. या संदर्भाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी नंबरप्लेटच्या प्रक्रियेत काही सुधारणा केल्या. सोबतच‘एचएसआरपी’प्लेट पुरवठा करणाऱ्या पुरवठादार संख्या वाढविण्याच्या सूचना वाहन कंपन्यांना देण्यात आल्या. यामुळे नंबरप्लेट मिळण्याचा कालावधी आता आठ दिवसांवर आला आहे. परंतु परिवहन आयुक्तांनी काढलेल्या नव्या सूचनांमध्ये प्रलंबित असलेल्या वाहनांना दोन दिवसांत ‘एचएसआरपी’ प्लेट बसविण्याचे व ‘एचएसआरपी’प्लेट बसविल्याशिवाय वाहनांचा ताबा मालकांना देऊ नये असे निर्देश दिले.