ह्युंदाई या कंपनीने ग्लोबल सीईएस 2019 मध्ये चक्क चालणाऱ्या कारची संकल्पना दाखविली आहे. ही कार 5 किमी प्रती तास एवढ्या वेगाने खडकाळ, डोंगरदऱ्यांमधून चालणार आहे.
ह्युदाईने या कारचे छोटे मॉडेल या प्रदर्शनात ठेवले होते. यामध्ये या कारला रोबोटिक पाय चाकांसह लावण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे ही कार 5 फूट उंचीच्या भिंतीवर लटकू किंवा भिंतीपलिकडे उडी मारू शकते. ह्युंदाई इलेव्हेट असे या कारचे नाव ठेवण्यात आले असून याचा वापर भूकंप, अपघातावेळी बचावकार्यासाठी होणार आहे. या कारला त्यांनी चाकांपेक्षा काहीतरी वेगळे, अशा संकल्पनेमध्ये मांडले आहे.
या कारची संकल्पना तीन वर्षांपासून विकसित करण्यात येत आहे. जेव्हा त्सुनामी किंवा भूकंपासारखी आपत्ती येते तेव्हा आपल्याकडील साधने कमी पडतात. यामुळे कुठेही चालू किंवा धावू शकणारे वाहन बनविल्यास त्याचा वापर अशा वेळी केला जाऊ शकतो. यामुळे या कारची संकल्पना सुचली आणि लवकरच प्रत्यक्षात आणली जाईल, असे कंपनीचे उपाध्यक्ष जॉन सूह यांनी सांगितले.
कंपनीने या कारचा प्रोटोटाईप व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये पाहून एखादा परग्रहावर पाठविलेला रोबोट असल्याचा भास निर्माण होतो.