पुणे - शहरातील युटिलिटी वाहन उत्पादक फोर्स मोटर्सने आज देशांतर्गत बाजारात आपली नवीन व्हॅन फोर्स अर्बानिया(Force Urbania) लाँच केली आहे. आकर्षक लूक आणि अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेली ही व्हॅन तीन वेगवेगळ्या सीटिंग कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केली आहे. ज्यामध्ये १०-सीटर, १३-सीटर आणि १५-सीटर पर्याय उपलब्ध आहेत. नवीन Force Urbania ची सुरुवातीची किंमत २८.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.
२८.९९ लाख रुपये किंमत असलेल्या फोर्स अर्बानियाच्या १० आसनी प्रकारात १० प्रवासी आणि एक ड्रायव्हर बसू शकतात. त्याच वेळी, १३-सीटर व्हेरिएंटची किंमत २९.५० लाख रुपये आहे, ज्यामध्ये १३ प्रवासी आणि एक ड्रायव्हर बसू शकतात. याशिवाय, लाँग व्हीलबेस व्हेरिएंटमध्ये १७ प्रवासी आणि एक ड्रायव्हर बसण्याची व्यवस्था आहे, ज्याची किंमत ३१.२५ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.कंपनीने या व्हॅनमध्ये Mercedes-Benz sourced FM 2.6-लीटर क्षमतेचे CR ED TCIC डिझेल इंजिन वापरले आहे, जे ११५ HP पॉवर आणि ३५० Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.
काय आहेत खास फिचर्स? या व्हॅनमध्ये जागतिक दर्जाची वैशिष्ट्ये देण्यात येत असल्याचा फोर्स मोटर्सचा दावा आहे. कंपनीने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये व्हॅनचे बाह्य आणि आतील भाग दोन्ही व्यवस्थित दिसत आहेत. ही देशातील पहिल्या पूर्णपणे ग्राउंड-अप, मॉड्यूलर पॅनेल व्हॅन प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने, हिल होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) सह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि व्हेंटिलेटेड डिस्क्स यांसारखी वैशिष्ट्ये व्हॅनमध्ये दिली आहे.
क्रॅश, रोलओव्हर आणि पादचारी सुरक्षा नियमांचे पालन करणारी Urbania ही देशातील पहिली व्हॅन आहे. खरं तर, ही वैशिष्ट्ये अद्याप बंधनकारकही केलेली नाहीत. यावरून कंपनीची दूरदृष्टी दिसून येते, ज्या प्रकारे सरकार देशातील वाहनांमध्ये सुरक्षा वैशिष्ट्यांबाबत नवीन नियम लागू करत आहे, ते एक चांगले पाऊल आहे. यात ड्रायव्हर आणि को-ड्रायव्हर दोघांनाही एअरबॅग मिळतात. याशिवाय ८ स्पीकरचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
वाहन चालकाच्या कम्पर्ट आणि सुविधा लक्षात घेता त्यात कारसारखे स्टीयरिंग व्हील, टिल्ट आणि टेलिस्कोपिक अॅडजस्टेबल स्टीयरिंग कॉलम, एर्गोनॉमिकली डिझाइन केलेले कॉकपिट, डॅशबोर्ड माउंटेड गियर लीव्हर, बिल्ट इन ब्लूटूथ आणि कॅमेरा इनपुटसह ७-इंच टचस्क्रीन यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. इंजिन स्टार्ट-स्टॉप आणि रिव्हर्स पार्किंग असिस्टेंस देखील समाविष्ट केले आहे. इतर वैशिष्ट्यांमध्ये पर्सनल एसी व्हेंट्स, रिक्लाइनिंग सीट्स, पॅनोरॅमिक विंडो, रीडिंग लॅम्प, यूएसबी पोर्ट सुविधा दिल्या आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"