दोन वर्षांपूर्वी भारतीय बाजारपेठ कायमची सोडून जाणारी कंपनी फोर्ड पुन्हा भारतात येण्याच्या विचारात दिसत आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार फोर्डने चेन्नईतील प्लांट जेएसडब्ल्यू ग्रुपला विकण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, ही डील फायनल स्टेजमध्ये असतानाचा रद्द केली आहे. यामुळे भारतात परतण्याचे कंपनीने दरवाजे उघडे ठेवल्याचे बोलले जात आहे.
फोर्डने बिझनेस रिस्ट्रक्चरच्या नावाखाली भारतातील उत्पादन आणि विक्री बंद केली होती. यामुळे भारत सोडून जाणारी फोर्ड ही दुसरी मोठी अमेरिकन कंपनी ठरली होती. फोर्डला भारतात फारसे यश आले नव्हते. सुरुवातीला महिंद्रसोबतची डील फिस्कटल्याने फोर्डच्या ग्राहकांना डीलरनी लुटले होते. यामुळे हाय मेंटेनन्सची झालेली बदनामी फोर्डला भारतात पाय रोवू देत नव्हती.
भारतातून काढता पाय घेतल्यानंतर फोर्डने आपला साणंदमधील प्लांट टाटाला विकला होता. दुसरा चेन्नईचा प्लांट कंपनीने महिंद्रा आणि व्हिएतनामची इलेक्ट्रीक मॅन्युफॅक्चरर कंपनी विनफास्टला विकण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर जेएसडब्ल्यु ग्रुपसोबत फोर्डची बोलणी सुरु झाली होती. ही डील अंतिम टप्प्यात असताना फोर्डने अचानक ती रद्द केली आहे.
एवढेच नाही तर फोर्ड काही कामांसाठी कर्मचारी भरती करू इच्छित आहे. फोर्ड आताही मुल्यांकन करतच आहे. अजून भारतात परतण्याचा निर्णय घेतलेला नाहीय. फोर्डने १९९५ पासून २०१८ पर्यंत १० लाख कार विकल्या होत्या. जेव्हा फोर्ड भारतात आलेली तेव्हा तिचे नाव महिंद्रा फोर्ड इंडिया लिमिटेड होते. परंतू, त्यांची ही डील एक वर्षभर पण टिकली नव्हती. यामुळे कंपनीला स्पेअर पार्ट परदेशातून आणावे लागत होते. यामुळे ते महागडे ठरत होते. तसेच या फटक्यामुळे डीलरनी देखील ग्राहकांना लाखा लाखाची बिले काढून लुटण्यास सुरुवात केली होती. भारत सोडून जाताना फोर्डकडे ११००० कर्मचारी होते.