अमेरिकेची बडी ऑटोमोबाईल कंपनी मेटाकुटीला आली आहे. गेल्याच वर्षी कंपनीने भारतातून काढता पाय घेत कर्मचारी आणि कार घेतलेल्या ग्राहकांना धक्का दिला होता. आधीच बदनाम असलेली कंपनी आणखीनच बदनाम झाली आहे. असे असताना फोर्डचा सानंदमधील एक प्लांट विकत घेऊन टाटाने मदत केली. तरी देखील कंपनी फोर्ड इंडियातील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे.
फोर्ड मोटर भारतातील आणि उत्तर अमेरिकेतील एकूण ३००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करणार आहे. कंपनी सध्या टेस्ला सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी सॉफ्टवेअरवर चालणारी इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यामागे लागली आहे. यामुळे कंपनीला जुन्या कर्मचाऱ्यांची गरज राहिलेली नाही. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, काढून टाकण्यात येणाऱ्यांपैकी सुमारे 2,000 कर्मचारी हे कंपनीच्या पेरोलवर आहेत. तर उर्वरित १००० कर्मचारी हे कंत्राटी आहेत. फार्ले आणि फोर्डचे अध्यक्ष बिल फोर्ड यांनी कर्मचार्यांना पाठवलेल्या ईमेलद्वारे याची माहिती दिली आहे. आम्ही काही नोकऱ्या कमी करत आहोत. फोर्डच्या व्यवसायाची पुनर्बांधणी केली जात आहे. तुम्ही याबाबत तुमच्या टीम लीडरसोबत चर्चा करू शकता, असे बिल फोर्ड यांनी म्हटले आहे.
ऑटो उद्योग जेव्हा इलेक्ट्रीक वाहने आणि डिजिटल सर्विसकडे वळला तेव्हा कर्मचाऱ्यांकडे त्यासाठीचे कौशल्य नव्हते. जुन्या तंत्रज्ञानावर काम करणारे अनेकजण होते, असे फोर्डचे मुख्य कार्यकारी जिम फार्ली गेल्या काही महिन्यांपासून म्हणत होते. इलेक्ट्रिक वाहनांची एक मोठी लाइनअप विकसित करण्यासाठी फार्ले यांनी नवीन धोरण स्वीकारले आहे. टेस्लाप्रमाणेच, फोर्डला देखील डिजिटल सॉफ्टवेअर आणि कनेक्टिव्हिटीवर अवलंबून असलेल्या या सेवांद्वारे अधिक महसूल मिळवायचा आहे.
फोर्डने 2023 पर्यंत 5 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याची घोषणा केली आहे. ईव्ही बनवण्यासाठी कंपनीने बॅटरीही विकसित केली आहे. कंपनीने वार्षिक 60 GWh क्षमतेच्या कंपनीशी करार केला आहे.