भारतातून फोर्ड मोटर्सच्या एक्झिटची म्हणजेच प्लांट बंद करण्याची घोषणा करणारे अनुराग मेहरोत्रा यांनी टाटा मोटर्समध्ये नोकरी पत्करली आहे. फोर्डच्या ग्राहकांना अनुराग यांनी पुढील दहा वर्षे कंपनी सेवा, स्पेअरपार्ट देणार असल्याचे आश्वासन दिले होते. यानंतर काही दिवसांतच ते फोर्डचे एमडीपद सोडत असल्याचा बातम्या आल्या होत्या. आता त्यांनी टाटा मोटर्समध्ये आंतरराष्ट्रीय बिझनेस आणि स्ट्रेटेजी विभागाचे उपाध्यक्ष पद स्वीकारले आहे. (Former Ford India MD Anurag Mehrotra joins Tata Motors)
फोर्डने भारतीय बाजाराला साजेशा, तंत्रज्ञान युक्त गाड्याच लाँच केल्या नाहीत. ज्या केल्या त्या काळानुरूप अपडेट केल्या नाहीत. यामुळे अलीकडच्या काळात आलेल्या किया, एमजी सारख्या कंपन्यांना भारतीयांनी जोरदार प्रतिसाद दिला. फोर्डसोबतच भारतात आलेल्या ह्युंदाईची स्थिती आज दुसऱ्या क्रमांकावर भक्कम आहे. नुकसानीत असलेली टाटा मोटर्सने अमुलाग्र बदल करत फोर्डची दणकट गाड्यांची ओळख पार पुसून टाकली आहे. हे बदल फोर्डच्या भारतातील नेतृत्वाला करता आले नाहीत. प्रामुख्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका फोर्डच्या ग्राहकांनी ठेवला आहे.
फोर्ड इंडिया बंद करण्याची घोषणा केली तेव्हा अनुराग यांनी फोर्डच्या ग्राहकांशी संवाद साधला होता. तेव्हा काही लोकांच्या मनातील शंका त्यांनी दूर केल्या होत्या. यामध्ये फोर्ड आपल्या ग्राहकांना सेवा देत राहील. स्पेअर पार्ट उपलब्ध असतील आदी आश्वासने त्यांनी दिली होती.
अनुराग हे गेल्या दशकभरापासून मार्केटिंग, सेल्स आणि सेवा आदी विभागांचे प्रमुख होते. त्यांनी 30 सप्टेंबरला फोर्डला बायबाय केला. आता ते टाटामध्ये कमर्शिअल व्हेईकलचे कार्यकारी संचालक गिरीष वाघ यांच्या हाताखाली काम करतील. कमर्शिअल व्हेईकलचा व्यवसाय हा टाटा मोटर्सच्या एकूण उत्पादनापैकी खूप छोटा विभाग आहे. एकूण उत्पादनाच्या 12 टक्के भाग हा या वाहनांचा आहे.