नवी दिल्ली : भारतीय ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा ने अमेरिकेची दिग्गज कंपनी फोर्ड इंडियामध्ये 51 टक्के समभाग खरेदी करण्याची घोषणा केली आहे. दोन्ही कंपन्यांनी हातमिळवणी केली असून एकत्रितपणे फोर्डचा व्यवसाय सांभाळणार आहेत. याद्वारे महिंद्रा आणि फोर्डच्या कार एकत्रित विकल्या जाणार आहेत.
महिंद्रा आणि महिंद्राकडून काल याची माहिती देण्यात आली. महिंद्रा 657 कोटी रुपयांमध्ये 50 टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे. उर्वरित हिस्सेदारी इक्विटी ऑडरेरकडेच राहणार आहे. फोर्ड भारतातील व्यवसाय या सहकार्य करारासोबत संयुक्त उपक्रमाकडे देणार आहे. यामध्ये सानंद आणि चेन्नईचा असेम्ब्ली प्लांटही असणार आहे. मात्र, सानंदचा इंजिन उत्पादन प्लांट, ग्लोबल बिझनेस सर्व्हिस युनिट आणि फोर्ड क्रेडीट, फोर्ड स्मार्ट मोबिलीटी फोर्डकडेच राहणार आहे.
फोर्ड आणि महिंद्रा यांच्यात झालेला हा नवा करार 2017 मध्ये दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या रणनीतीक सहकार्य कराराचा एक भाग आहे. सर्व मंजुऱ्या वेळेत मिळाल्या तर 2020 च्या मध्यानंतर संयुक्त उपक्रम कार्यरत होणार आहे. याची महत्वाची जबाबदारी म्हणजे फोर्डला भारतीय बाजारात विकसित करणे आणि जागतिक भागीदारीमध्ये वाढ करणे असणार आहे. फोर्डवर फोर्डची मालकी आणि महिंद्रावर महिंद्राची मालकी राहणार आहे. तसेच महिंद्राचे वेगळे शोरूमही तसेच राहणार आहेत. फक्त दोन्ही कंपन्या मिळून ज्या कार विकसित करतील त्यांची दोन्ही शोरुमद्वारे विक्री करता येणार आहे.
फोर्ड ही जगातील आघाडीच्या वाहन कंपन्यांमध्ये असलेली अमेरिकेची मोठी कंपनी भारतात गेल्या 20 वर्षांपासून जम बसवत होती. एवढी वर्षे झगडून ही कंपनी पहिल्यांदा फायद्यात आली आहे. मात्र, सध्याच्या वाहन उद्योगासमोरील अडचणी, मंदी आणि इलेक्ट्रीक वाहनांसाठी आवश्यक असलेले बदल यामुळे कंपनीने महिंद्रा आणि महिंद्रासोबत करार केला आहे. यामुळे फोर्ड भारत सोडणार असल्याचे वृत्त कमालीचे व्हायरल झाले आणि एकच खळबळ उडाली होती.
24 वर्षांनी पुन्हा एकत्र फोर्डने 90 च्या दशकात जेव्हा भारतात एन्ट्री केली तेव्हा त्यांनी महिंद्रासोबत 50-50 टक्के भागीदारी केली होती. मात्र, काही कारणास्तव ही भागीदारी वर्षभरात तुटली होती. यानंतर फोर्डने 1998 मध्ये ही भागीदारी 72 टक्क्यांवर नेत फोर्ड इंडियाची स्थापना केली.