फोर्डच्या वाहनांमध्ये ट्रान्समिशनची समस्या समोर आली आहे. यानंतर, आता कंपनीने ही समस्या दूर करण्यासाठी तब्बल 29 लाख वाहने परत बोलवली आहेत. रोलअवे क्रॅशची शक्यता पाहता ही वाहने परत बोलवण्यात आली आहेत.
परत बोलावण्यात आलेल्या या वाहनांमध्ये 2013 ते 2019 दरम्यान तयार झालेल्या काही एस्केप, 2013 ते 2018 दरम्यान तयार झालेली सी-मॅक्स, 2013 ते 2016 दरम्यान तयार झालेली फ्यूजन, 2013 ते 2021 दरम्यान तयार झालेली ट्रांझिट कनेक्ट आणि 2015 ते 2018 दरम्यान तयार झालेली एज गाड्यांचा समावेश आहे.नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार, शिफ्टर केबलला ट्रांसमिशनशी जोडणारे बुश खराब अथवा वेगळे होऊ शकते. ते गाडी गेअरमध्ये शिफ्ट होण्यापासून रोखू शकते.
फोर्डने दिलेल्या माहितीनुसार, या समस्येमुळे आतापर्यंत चार अपघात नोंदवले गेले आहेत. याशिवाय, यासमस्येसंदर्भात कंपनीकडे 1,630 वारंटी रिपोर्ट आणि 233 तक्रारीही आल्या आहेत. ग्राहक डीलरकडे जाऊन हे बुश रिप्लेस करून घेऊ शकतात. कंपनी यासंदर्भात 27 जूनपासून लेटरच्या माध्यमाने ग्राहकांना सूचना देईल.