मारुती सुझुकी 2023 ची सुरुवात आपल्या पोर्टफोलियोमध्ये एक नवे मॉडेल जोडून करण्यासाठी तयार आहे. कार निर्माता कंपनीने पुष्टी केली आहे, की जानेवारी महिन्यात दिल्ली येथे होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये तीन नव्या एसयूव्ही शोकेश करण्यात येणार आहेत. यात नव्या मारुती कूप एसयूव्हीचाही (कोडनेम- YTB) समावेश असेल. मात्र, हिच्या अधिकृत नावासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकराची माहिती समोर आलेली नाही. मात्र, हिला मारुती बलेनो क्रॉस नाव दिले जाऊ शकते, असे काही माध्यमांतील वृत्तांमधून म्हणण्यात येत आहे.
बूस्टरजेट इंजिन -मारुतीचे बूस्टरजेट टर्बो पेट्रोल इंजिन नवीन मारुती कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये वापरले जाऊ शकते. यापूर्वी, BS6 तयार नसल्याने हे इंजिन बंद करण्यात आले होते. मात्र, ते आता BS6 सह येईल. या इंजिनमध्ये माइल्ड हायब्रिड तंत्रज्ञानही दिले जाऊ शकते. यात नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनचे ऑप्शनही दिले जाऊ शकते. जे 1.2L डुअलजेट अथवा 1.5L डुअलजेट माइल्ड हायब्रिड टेक युनिट असू शकते. या कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक, असे दोन्ही गिअरबॉक्स ऑफर केले जातील.
डिझाईन आणि फीचर्स -मारुती बलेनो क्रॉसमध्ये ब्रँडची नवी एसयूव्ही डिझाईन लँग्युएज बघायला मिळू शकते. जी आपण ग्रँड व्हिटारामध्ये पाहिली आहे. यात स्प्लिट हेडलॅम्प सेटअप आणि स्लिम एलईडी डीआरएल तसेच बोनटच्या टॉपवर सिग्निचर 'थ्री-ब्लॉक' मॉनीकरसह अधिक अँग्युलर स्टान्स मिळू शकतो. हिचे काही डिझाईन एलिमेंट्स बलेनो हॅचबॅक आणि फ्यूचरो ई-कॉन्सेप्ट सारखेही असू शकतात. मारुती सुझुकीच्या नव्या कूप एसयूव्हीमध्ये वायरलेस अॅप्पल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी असलेले 9-इंचाचे टचस्क्रीन इंफोटेनमेन्ट सिस्टिम मिळू शकते. यात व्हॉइस कमांड आणि सुझुकी कनेक्ट फीचर्सदेखील असतील. या कारमध्ये डिजिटल कंसोल, ऑटो एसी यूनिट, रिअर एसी व्हेंट आणि अधिक एअरबॅगदेखील दिल्या जातील.
लॉन्चिंग आणि किंमत -नवी मारुती वायटीबी एसयूव्हीच्या आधिकारिक लॉन्चिंग डेटसंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची घोषणा झालेली नाही. मात्र, माध्यमांतील वृत्तांनुसार, कारचे प्रोडक्शन व्हर्जन एप्रिल 2023 पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते. हिच्या बेस मॉडलची किंमत 8 लाख रुपये, तर टॉप-एंड ट्रिमची किंमत 13 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. किंमतीची हीच रेंज असल्यास ही टाटा नेक्सन, निसान मॅग्नाइट, ह्युंदाई वेन्यू सारख्या एसयूव्हींना टक्कर देईल. याशिवाय ही क्रेटाच्याही काही सुरुवातीच्या व्हेरिअंट्सना टक्कर देऊ शकते.