देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने लाखो ग्राहकांना जोरदार धक्का दिला आहे. येत्या १ एप्रिलपासून कंपनी आपल्या कारच्या किंमती वाढविणार आहे. या किंमती किती वाढणार हे अद्याप कंपनीने जाहीर केलेले नाही.
बीएस ६ दुसरा टप्पा लागू झाल्याने कंपन्यांना त्यांच्या वाहनांमध्ये बदल करावे लागणार आहेत. यामुळे याचा खर्चही वाढणार आहे. तो खर्च या कंपन्या ग्राहकांकडून वसूल करणार आहेत. मारुतीने दरवाढीची घोषणा केली आहे.
कंपनी एप्रिल 2023 मध्ये किमती वाढवणार आहे. वाहनांच्या निर्मिती खर्चात वाढ झाल्याने वाहनांच्या किमतीत ही वाढ करण्यात येत आहे. मारुती सुझुकी सतत खर्च कमी करण्यासाठी आणि काही प्रमाणात वाढ भरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतू तरीही किंमत वाढवणे गरजेचे बनले आहे, असे मारुतीने म्हटले आहे.
देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हिरोने देखील दरवाढीची घोषणा केली आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे वाहनांच्या किमतीत वाढ करण्यात येत असल्याचेही हिरो मोटोकॉर्पचे म्हणणे आहे. Hero MotoCorp च्या बाइक्स आणि स्कूटरच्या किमतीत सुमारे 2 टक्क्यांनी वाढ होणार आहे. टाटाने देखील व्यावसायिक वाहनांच्या किंमती ५ टक्क्यांनी वाढविल्या होत्या.
नवीन कारची किंमत वाढली की त्याचा परिणाम सेकंड हँड कार मार्केटवर होतो. नव्या कारच्या किंमतीच्या तुलनेत वापरलेल्या कारच्या किंमती ठरविल्या जातात. यामुळे या जुन्या कारच्या किंमतीतही वाढ होणार आहे. यामुळे पेट्रोल, डिझेल तर महागलेले असेल परंतू जुनी कारही घेणे परवडणारे नाही. यामुळे आहे त्याच कारचा वापर करणे किंवा कार भाड्याने घेणे किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे हेच पर्याय हातात राहणार आहेत.