कोणत्याही वर्दळीच्या व वाहतूक बऱ्यापैकी असलेल्या किंवा अगदी सिंगल वा डबलरोडवरूनही कार चालवताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक वाहनाला मार्ग देणे, मार्ग काढणे. वाहन मग ते ओव्हरटेक करीत असो किंवा समोरून येणारे वाहन असो की तुम्ही कोणाला ओव्हरटेक करीत असा. वाहतुकीमध्ये परस्परांना समजून घेणे हे गरजेचे असते. तसे नीट नियमन झाले नाही तर मग मात्र वाहतूक कोंडी होऊ शकते, अपघात होऊ शकतो किंवा त्या कामामध्ये विनाकारण वेळही जातो. रस्त्यावरून जाताना साईड देणे व साईड घेणे या दोन क्रिया महत्त्वाच्या असतात. त्यासाठी तुम्हाला रस्त्याचा व स्वतःच्या वाहनाचा पूर्णपणे अंदाज येणे महत्त्वाचे असते. केवळ गाडीवर हात बसला आहे, असे म्हणून चालत नाही. हायवेवर अनेकदा समोरून येणाऱ्या वाहनांच्या रांगेत घुसले जाते व त्यामुळे साइड देणे तर दूरच पण विनाकारण वाहतूक कोंडी होऊन बसते.
हायवेवर साइड देताना समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज घेऊन त्याला पास लाइट द्यावा म्हणजे तुम्हाला व त्याला दोघांनाही परस्परांचा अंदाज येतो. समोरून येणारे वाहन कोणाला ओव्हरटेक करून येत असेल तर त्याच्यातील व तुमच्यामधील अंतर पाहून योग्य निर्णय घ्यावा लागतो. तेथे घाई करून चालत नाही. अन्यथा समोरचे वाहन वेगात असेल व तुम्ही वेग कमी केला नाही किंवा त्याच्यात व तुमच्यात योग्य अंतर राखले नाही तर अपघात होण्याची शक्यता असते. सर्वसाधारणपणे विभाजक नसलेल्या महामार्गावर वा रस्त्यावर असे प्रसंग अनेकदा ओढवतात. अशा वेळी शांतचित्ताने ओव्हरटेक करणाऱ्या व समोरून येणाऱ्या वाहनाला जाऊ द्यावे, त्याला पास लाइट वा डिप्पर अप्पर देऊन तुमची सुरक्षितताही पाहावी.
समोरून येणाऱ्या वाहनाला साइड देताना तुमच्या रस्त्याचा अंदाज घ्यावा व शक्यतो तुम्ही तुमच्या रस्त्याच्या कडेला उतरून मुख्य रस्ता सोडू नये. यासाठी तुम्ही नियंत्रणपूर्वक वाहन चालवणे गरजेचे आहे. मागून ओव्हरटेक करून तुमच्यापुढे एखादे वाहन जात असेल तर त्याला तुमच्यासमोरून वाहन येत नाही ना याची खात्री करून मग पुढे जाण्याचा इशारा द्यावा. हल्ली हाताने इशारा देण्याऐवजी काही वाहनचालक उजव्या बाजूचा साइड इंडिकेटर देतात, मात्र त्यामुळे अनेकदा गफलत होऊ शकते. मागून येणाऱ्या वाहनाला हात दाखवून पुढे जाण्याचा इशारा करावा किंवा वाहन सरळ रेषेत ठेवून त्याला जाऊ द्यावे. मागून येणारे वा समोरून येणारे वाहन हे धडक न होता सुखरूपपणे रस्त्यावरून जाणे हे सतत घडणारे असून त्यामुळे वाहन चालवताना दक्ष राहाणे गरजेचे असते.
शहरामध्ये पांढरे पट्टे आखून तुम्हाला रांगेत जाण्यासाठी नियमन केलेले असते. विभाजक नसलेल्या ठिकाणी तुम्ही किंवा समोरचे वाहन रांग मोडू नये. तसेच ती रांग ओलांडून समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज घेऊन पुढे जावे. मात्र जेथे तुटक पांढरी रेषा असेल तेथे अशा पद्धतीने जावे. सलग पांढरा पट्टा असेल तर शक्यतो समोरून येणाऱ्या वाहनांच्या रांगेत जाऊ नये. अर्थात काहीवेळा परिस्थिती व वाहतूक कोंडीमुळे अशा प्रकारे घाई करत जाणारे वाहनचालक अन्य लोकांची मात्र पंचाइत करीत असतात. शहराती वा मोठा रूंद असलेल्या रस्त्यावर डाव्या बाजूनेही वाहने ओव्हरटेक करीत असतात. त्यांना त्यांच्या रांगेतून पुढे जाता येते मात्र अशावेळी तुम्ही तुमची डावी बाजूही पाहावी व त्यानुसार तुमचे वाहन तुमच्या रांगते ठेवावे. साइड देणे घेणे हे एकदा का नीट जमले व इंडिकेटर्सचा त्यामध्ये योग्य पद्धतीने वापर केला तर ड्रायव्हिंगमधील बरीच काही सूत्रे तुम्हाला शिकवून जातात.