दरवर्षीचा अपघाताचा आकडा आणि अपघाती मृत्यूंचा आकडा वाढतच चालला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वेळेवर उपचार न मिळणे हे आहे. अगदीच महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत महत्वाच्या व्यक्तींचा अपघात झाला होता. मेटे, मिस्त्री या राजकारणी आणि उद्योगपतींना जीव गमवावा लागला होता. पैकी मेटे यांना कित्येक तास मदत मिळाली नव्हती. यामुळे त्यांचा जीव गेल्याचा आरोप त्यांच्या ड्रायव्हरने केला होता. अपघातानंतर जमखीला वाचविण्यासाठी पहिला तास हा गोल्डन अवर असतो, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
अपघात झाल्या झाल्या जखमीला पहिल्या तासात योग्य उपचार मिळाले तर तो वाचतच नाही तर लवकर रिकव्हर होतो, असा दावा डॉक्टरांनी केला आहे. अपघात झाल्यानंतर जखमी व्यक्ती मृत्यूशी झुंझत असतो. जीवन आणि मृत्यूच्या मध्येच असताना त्याला योग्य उपचार मिळणे आवश्यक असते. फ्रान्सच्या सैन्याने पहिल्या विश्वयुद्धावेळी याचा प्रयोग केला होता. अपघातानंतर पहिला तास यासाठी महत्वाचा असल्याचे मानले गेले आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार रस्ते अपघातात उपचार वेळेत मिळाले तर मृतांची संख्या निम्म्याने कमी केली जाऊ शकते. अपघात झाल्यावर जखमीच्या शरीरातून रक्त जाऊ लागते. जेवढा वेळ लागेल तेवढे जास्तीचे रक्त वाया जाते व त्याच्या जिवाला धोका वाढतो. यामुळे जेवढे शक्य तेवढे लवकर उपचार मिळाले तर त्याचा जीव वाचविला जाऊ शकतो.
काही वर्षांपूर्वी रस्ते अपघात झाला तर कोणी मदत करण्यास पुढे येत नव्हते. कारण कायद्यानुसार जो मदत करेल त्यालाच पोलीस चौकशीच्या फेऱ्यात अडकवत होते. या कटकटीमुळे कोणी अपघातग्रस्तांना मदत करत नव्हते. आता सरकारने कायदा बदलून मदत करणाऱ्यांना पोलीस त्रास देणार नाहीत, अशी सोय केली आहे. यामुळे थोडीफार मदत होत आहे.