गेल्या वर्षी जागतिक स्तरावर ८.८ कोटी वाहने विकली गेली आहेत. यात भारताचा कार श्रेणीतील वाटा ४१ लाख एवढा आहे. गेल्या वर्षी आधीच्या तुलनेत ८ टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे. एकंदरीत वाहन उद्योगासाठी ही दिलासा देणारी बाब असली तरी देशातील रस्ते आणि पार्किंगची सुविधा यासाठी ही धोक्याची घंटा आहे.
गेल्या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये भारतीयांनी एसयुव्हींना जास्त पसंती दिली आहे. यामुळे ग्राहकाचा मुड हा आता छोट्या कार ऐवजी मोठ्या, मध्यम आकाराच्या एसयुव्हींकडे वळू लागला आहे. तसेच ग्राहकांची खर्च करण्याची क्षमताही वाढली असल्याचे हे संकेत आहेत. यामुळे कंपन्यांनी देखील अगदी साडे सहा लाखांपासून एक्स शोरुम किंमती सुरु होणाऱ्या एसयुव्ही टाईप कार बाजारात आणल्या आहेत.
कॅलेंडर वर्ष २०२३ मध्ये देशातील प्रवासी वाहनांची घाऊक विक्री ८.३ टक्क्यांनी वाढून ४१.०८ लाख युनिट्सवर पोहोचली आहे. यामध्ये, स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल म्हणजेच SUV सेगमेंटचा निम्मा वाटा आहे. गेल्या वर्षी वाहनांची सरासरी किंमत ११.५ लाख रुपयांपर्यंत वाढली होती, तर २०२२ मध्ये ही सरासरी १०.५८ लाख रुपयांची राहिली होती. म्हणजेच ग्राहकांनी जास्त किंमतीच्या कारना अधिक पसंती दिली आहे. तसेच कारच्या किंमतीदेखील वाढल्या आहेत. याचाच परिणाम सरासरी विक्री किंमतीत वाढ झाली आहे.
मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटर, टाटा मोटर्स आणि टोयोटा किर्लोस्कर मोटरसाठी 2023 हे वर्ष सर्वोत्तम विक्रीचे ठरले आहे. मारुती सुझुकीने 2023 मध्ये 20 लाख युनिट्स विकली आहेत. ह्युंदाईने 7,65,786 युनिट्स विकली आहेत. टाटाने 5.53 लाख वाहने विकली आहेत. टोयोटाने 2,33,346 लाख वाहने विकली आहेत.