लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गुगल मॅप प्रवाशांच्या सोयीसाठी काही नवे फीचर आपल्या ॲपला जोडत असून, प्रवासादरम्यान रस्त्यावर प्रवाशांना किती टोल भरावा लागू शकेल, याच्या माहितीचा त्यात समावेश असणार आहे.
सूत्रांनी सांगितले की, या सुविधेमध्ये प्रवाशांच्या मार्गातील सर्व टोल गेट्सची माहिती गुगल मॅपवर उपलब्ध होईल. त्यातून प्रवासादरम्यान लागणाऱ्या टोलची माहिती प्रवाशांना प्रवास सुरू करायच्या आधीच मिळेल. टोल गेट्सचा मार्ग स्वीकारायचा की नाही, याचा निर्णय घेणे प्रवाशांना त्यामुळे सोयीचे होईल. त्यामुळे ही सुविधा प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. हे फीचर सर्वच देशांत उपलब्ध असेल का, याची माहिती मात्र तात्काळ उपलब्ध होऊ शकली नाही.
नव्या सुविधेबाबत गुगलने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तथापि, ‘ॲण्ड्रॉइड पोलीस’ने गुगल मॅप प्रीव्ह्यू प्रोग्रामच्या एका सदस्याच्या हवाल्याने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. आगामी फीचरची माहिती देणारा एक मेल गुगल मॅप प्रीव्ह्यू प्रोग्रामच्या सर्व सदस्यांना पाठविण्यात आला आहे. आगामी काळात गुगल मॅपवर रस्त्यावरील सर्व टोलचे मूल्य, पूल आणि इतर मूल्य वर्धने उपलब्ध होतील. प्रवाशांनी ॲपवर प्रवासाचा मार्ग निवडताच ही माहिती त्यास उपलब्ध होईल.
वेझ ॲपकडून उचलले नवे फीचरसूत्रांनी सांगितले की, मॅपिंग ॲप वेझकडून हे फीचर गुगलने उचलले आहे. गुगलने २०१३ मध्ये वेझचे अधिग्रहण केले होते. या ॲपवर टोलची माहिती उपलब्ध होती. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका यांसह काही मोजक्या देशांत वेझची सेवा आहे. गुगल मॅपकडून तिचा विस्तार केला जाणार आहे.