नवी दिल्ली – भारताने बुधवारी ब्रिटनच्या ग्लासगोमध्ये सुरु असलेल्या कॉप २६(COP26) शिखर संमेलनात इलेक्ट्रिक वाहनांवर एक वेब पोर्टल ई अमृत लॉन्च केलेला आहे. ही इलेक्ट्रिक वाहनांशी निगडीत सर्व माहिती असलेली वन स्टॉप डेस्टिनेशन पोर्टल आहे. ज्याठिकाणी इलेक्ट्रिक वाहन(Electric Vehicle) वापरणे, खरेदी करणे, गुंतवणुकीची संधी आणि धोरण, अनुदान याबाबत माहिती मिळेल.
हे पोर्टल ब्रिटीश सरकारसोबत झालेल्या एका करारानुसार निती आयोगाने लॉन्च केलेलं आहे. त्याशिवाय हे पोर्टल ब्रिटन भारत संयुक्त रोडमॅप २०३० चा भाग आहे ज्यात दोन्ही देशाच्या पंतप्रधानांनी सही केली होती. या पोर्टलचं उद्दिष्ट आहे की, इलेक्ट्रिक वाहनांबाबत लोकांमध्ये जागरुकता आणावी. इलेक्ट्रिक वाहन वापराचे फायदे ग्राहकांना समजवण्यासाठी सरकारकडून यावर काम करण्यात येईल.
विशेष म्हणजे मागील काही काळापासून भारतात इलेक्ट्रिक वाहन खरेदीला चालना देण्यासाठी विविध पाऊलं उचलली जात आहेत. एकीकडे सरकार लोकांमध्ये जनजागृती करत आहे तर दुसरीकडे अनेक ठिकाणी वाहन खरेदी करण्यासाठी सब्सिडी देण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ई वाहन खरेदी करावं. भारतात सगळीकडे परिवहन कार्बनमुक्त करण्यासाठी आणि इलेक्ट्रिक मॉबिलिटीचा वापर करण्यासाठी वेगाने पाऊलं टाकली जात आहेत. इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे लोकांचा कल वाढावा यासाठी पीएलआयसारखी योजना गरजेची आहे.
इलेक्ट्रिक वाहनांबाबत जनजागृती
मागील काही काळात अनेकांनी इलेक्ट्रिक वाहन वापराचा फायदा सांगितला आहे. पुढील काळात देशभरात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढेल. कारण त्याचे खूप फायदे आहेत ज्यामुळे लोकांचा कल याकडे वाढत आहे. आता ई पोर्टलच्या सहाय्याने अमृत पोर्टल लोकांना योग्य माहितीसोबतच कुठे गुंतवणूक करणं फायदेशीर आहे त्याचीही माहिती देणार आहे. त्यामुळे ग्राहकांना फायदा मिळण्याची शक्यता आहे. ग्राहकांमध्ये जनजागृती आणून इलेक्ट्रिक वाहन खरेदीला चालना देण्याचा सरकारचा मानस आहे. म्हणूनच सरकार इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान, EVs बाबत ग्राहकांना विम्याचा पर्यायही देत आहे. जेणेकरून अधिकाधिक लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळतील.