चीनची प्रमुख वाहन निर्माता कंपनी ग्रेट वॉल मोटर्स (Great Wall Motors) ने भारतीय बाजारात उतरण्याची योजना बासनात गुंडाळली आहे.
गेल्या अडीच वर्षांपासून ही कंपनी भारतात येण्यासाठी प्रयत्न करत होती, कोरोनाच्या सुरुवातीलाच या कंपनीने भारतात पाय टाकण्यास सुरुवात केली होती. परंतू, सध्याच्या माहितीनुसार कंपनीने भारतातील आपले कार्यालय बंद केले आहे. तसेच सर्व ११ कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.
जीडब्ल्यूएम भारतात एक अब्ज डॉलर्स एवढी गुंतवणूक करणार होती. मात्र, एप्रिल २०२० मध्ये लागू झालेल्या नव्या FDI नियमांनंतर कंपनी परवानग्या मिळविण्यात अपयशी ठरली. गलवान घाटीमध्ये चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला होता, यानंतर भारताने चीनला कठोर प्रत्यूत्तर देत एफडीआय प़ॉलिसीमध्येच मोठा बदल केला होता. यामुळे चिनी कंपन्यांना भारतात गुंतवणूक करणे खूप कठीण होऊन बसले आहे.
GWM तळेगावमधील जनरल मोटर्सचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट विकत घेण्याबाबत चर्चा करत होती. मात्र, केंद्र सरकारने या कंपनीला एफडीआयनुसार परवानगी न दिल्याने हा व्यवहार रद्द करण्यात आला. या कंपनीने २०२० च्या ऑटो एक्स्पोमध्ये काही कार दाखविल्या होत्या, त्यातील एक कार ही जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार होती. आता या कारचे भारतात येणेदेखील जवळपास रद्द झाले आहे.
Great Wall Motors ची ही इलेक्ट्रीक कार R1 ह Ora EV या सब ब्रँडमध्ये येते. या कारमध्ये 33kWh लिथिअम आयन बॅटरी देण्यात आली आहे. ही कार फुल चार्जमध्ये 351 किलोमीटरपर्यंत जाते.