वाहनांच्या तंत्रज्ञानामध्ये त्या वाहनाचा ग्राऊंड क्लीअरन्स वा राइड हाइट हा घटक अतिशय महत्त्वाचा असतो. भारतासारख्या देशांमध्ये असलेल्या रस्त्यांचा व त्या रस्त्यांच्या परिस्थितीचा विचार करता वाहनाचा ग्राऊंड क्लीअरन्स हा किती जास्त असेल तितका चांगला असे मानले जाते. साधारणपणे सेदान, हॅचबॅक यांचा ग्राऊंड क्लीअरन्स हा एसयूव्ही,एमयूव्ही, स्टेशनवॅगन, जीपसारख्या फोरव्हीलड्राईव्ह वा ऑफ रोड असणाऱ्या वाहनांच्या तुलनेत खूप कमी असतो. शहरांमधील वमोठ्या व चांगल्या हायवेचा केवळ विचार केला तर कमी ग्राऊंड क्लीअरन्स हा वेगासाठी चांगला असतो. त्यावेळी वाहनाचा जमिनीला तळातील बाजूने स्पर्श होणार नाही, हे महत्त्वाचे असते. वाहनाच्या तळातील भागापासून जमिनीच्या पृष्ठभागापर्यंत असणारी पोकळी म्हणजे ग्राऊंड क्लीअरन्स. मिलीमीटरमध्ये हे अंतर मोजले जाते.
दुचाकी, चारचाकी वा अन्य कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर चालणाऱ्या वाहनाच्यादृष्टीने हा ग्राऊंड क्लीअरन्स महत्त्वाचा असतो. ग्राऊंड क्लीअरन्स जितका कमी तितका वाहनावर नियंत्रण करण्यासाठी लागणारा कौशल्याचा भाग तसा कमी लागतो. वाहन व्हॉबल होत नाही, त्यामुळे स्पोर्ट कारचा ग्राऊंड क्लीअरन्स हा खूप कमी असलेला ठेवतात. त्यामागे हेच तंत्र आहे. सर्वसाधारण वैयक्तिक वापराच्या मोटारींमध्ये आज सेदान, हॅचबॅक या पद्धतीच्या मोटारी वापरल्या जातात. त्यांचा ग्राऊंड क्लीअरन्स साधारण १६५ मिलीमीटर पासून १७५ मिलीमीटर पर्यंत असतो. एसयूव्ही, एमयूव्ही, या मध्यम व मोठ्या आकाराच्या वाहनांना तो अगदी २०० मिलीमीटरपर्यंत दिसून येतो.
भारतातील ग्रामीण भागातील खराब रस्त्यांवर कमी ग्राऊंड क्लीअरन्सऐवजी जास्त ग्राऊंड क्लीअरन्स असलेल्या मोटारींना आजकाल पसंती दिली जात आहे. तेथे ग्राऊंड क्लीआरन्स ही बाब अधिक प्रकर्षाने पाहू लागले आहेत,तसेच त्या पद्धतीच्या मोटारीही आज मिळत आहेत. अर्थात हॅचबॅक व सेदान मोटारींनाही असलेला ग्राऊंड क्लीअरन्स कमी असला तरी मोटारीचा तळातील भाग हा जमिनीच्या पृष्ठभागाला काही अगदी चिकटणारा नसतो. मात्र तशी कार चालवताना ग्रामीण भागामध्ये अतिशय हळूवार व खड्डे, उंचवटे पाहून चालवावी लागते. त्या तुलनेत एसयूव्ही वा ऑफरोड वाहनांना ती काळजी फार घ्यावी लागत नाही. एअरोडायनॅमिक रचनाही कमी ग्राऊंड क्लीरन्सच्या वाहनांना लाभते. सर्वसाधारण हे प्राथमिक वैशिष्ट्य लक्षात घेतले तरी ग्राहकाच्यादृष्टीने त्याचा कार निवडताना नक्कीच उपयोग होऊ शकेल.
अर्थात जसे फायदे या ग्राऊंड क्लीअरन्सच्या कमी उंचीबाबत असतात, तसे तोटेही जास्त ग्राऊंड क्लीअरन्सबाबत असतात. त्या त्या वाहनांच्या या घटकाचा अंदाज घेऊनच वाहन हाताळावे हे उत्तर. वाहनाच्या या विविध प्रकारच्या घटकांचे फायदे व तोटे दोन्ही असतात. मात्र स्पोर्ट कारसारखा अति कमी ग्राऊंड क्लीअरन्स भारतीय रस्त्यांना मात्र मानवणारा नाही, हे नक्की.