नवी दिल्ली : Tik Tok व्हिडीओचे वेड कोणाला काय करायला लावेल काही सांगता येत नाही. असाच एक प्रकार गुजरातमध्ये घडला आहे. राजकोटच्या एका गोल्डमॅनने त्याच्याच मॉडिफाय केलेल्या जीपलाआग लावली. मात्र, त्याला तुरुंगाची हवा खावी लागली आहे.
Tik Tok हे चीनी अॅप आहे. यावर व्हिडीओ बनवून मोठी प्रसिद्धी मिळवता येते. यामुळे अनेकजण या अॅपद्वारे व्हिडीओ बनवून झटपट प्रसिद्धी मिळवत आहेत. यातून काही वाईट गोष्टीही घडत आहेत. Tik Tok ने कमी काळात भारतात बस्तान बसविले आहे. या अॅपमुळे काहींना प्राणही गमवावे लागले आहेत. अश्लिल व्हिडिओंसाठीही हे अॅप बदनाम होत आहे. यामुळे मद्रासच्या हायकोर्टात या अॅपवर बंदी घालण्याची याचिका करण्यात आली होती. न्यायालयाने काही काळासाठी अॅपवर बंदीही आणली होती.
तर नवीन घटना अशी आहे की, गुजरातच्या राजकोटच्या इंद्रजित जडेजा याने रस्त्यावर त्याची मॉडिफाय केलेली जीप उभी केली होती. यानंतर व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करत गाडीवर पेट्रोल ओतले. यानंतर त्याने ही जीप पेटवून दिली. हा व्हिडीओ टीक टॉकवर व्हायरल झाला आहे. मात्र, अद्याप याबाबत स्पष्टता झालेली नाही की, जडेजा यांनी स्वता हा व्हिडिओ रेकॉर्ड केला की हे कृत्य करताना कोणी Tik Tok युजरने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. मात्र, या घटनेनंतर पोलिसांना सोशल मिडीयावर तक्रार प्राप्त झाल्यानंतर जडेजाला अटक करण्यात आली आहे.
या जीपची किंमत 10 लाखांच्या आसपास आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये ज्याने आग लावली त्याच्या गळ्यात जाडेजुड सोन्याच्या चैन आहेत. यामुळे त्याला पैशांची किंमत नसली तरीही जीपला आग लावल्याने पादचारी आणि वाहनांना धोका उत्पन्न होऊ शकतो. शिवाय त्याला आता रोखले नाही तर तो भविष्यात आणखी काहीतरी विध्वंसक करण्याची शक्यता आहे.