कार छान चकचकीत असावी, यासाठी पॉलिश करण्याचा एक साधा सोपा मार्ग आहे. हे पॉलिश वॅक्सबेस्ड असते. त्यामुळे तुम्ही पॉलिश केल्यानंतर त्यातील घटक तुमच्या कारच्या रंगावर एक विशिष्ट प्रकारचा लेयर तयार करतात. हा लेयर म्हणजे थर पातळ असतो व तो चमकदारही वाटतो. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे या थरामुळे कारच्या पृष्ठभागावर गुळगुळीतपणाही येतो. त्यामुळे त्यावर पाणी टाकल्यास ते झरकन खाली पडून जाते. पाणी शक्यतो त्या पृष्ठभागावर साचत नाही. हे पॉलिश हाताने व यंत्राने दोन्ही पद्धतीने करता येते. अथार्त प्रत्येकाकडे काही पॉलिश करण्यासाठी यंत्र असतेच असे नाही. दुसरी बाब ते यंत्र खरेदी करून त्याची देखभाल करणे, ते नीट ठेवणे यासाठीही जागेचा प्रश्न असतो. त्यापेक्षा पॉलिशचा पॅक घेतला की तो ठेवायला सोपा व वापरायलाही सोपा.
सुरुवातीला पॉलिश हे काहीसे घट्ट स्वरूपात येत होते. आता ते अतिशय मऊसर वा अगदी लोण्यासारख्या क्रीम स्वरूपातही मिळते, जे वापरायला सहज व सोपेही आहे. आठवड्यातून हाताने एकदा नीटपणे पॉलिश केले तरी दोन आठवडे सर्वसाधारण स्थितीत सहज जाऊ शकतात. अर्थात यंत्राद्वारे पॉलिश केल्यानंतरही त्याच्या टिकण्याची कालमर्यादाही तितकीच असते. कार पॉलिश कसे करावे, असा प्रश्न साहजिक पडतो. यंत्राने पॉलिश करायचे असेल तर तुम्हाला बाहेर गॅरेजला जाऊन त्यांच्या ताब्यात गाडी द्यावी लागते. सुमारे ४०० ते १००० रुपयांपर्यंत दाम मोजून यांत्रिक पॉलिश करून दिले जाते.( किंमती कमीजास्त असू शकतात.) हाताने तुम्ही स्वतः पॉलिश करणार असाल तर मात्र तुम्हाला थोडे कष्ट व थोडा व्यायाम मिळण्याची शक्यता आहेच.
एका चिनी चित्रपटात ज्युडो कराटे शिकून आपल्यावर हल्ला करणाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी एक मुलगा तयार होतो. त्याला त्याचा गुरू कार पॉलिश करायला लावतो. तेव्हा त्या मुलाला त्याचा फार राग येतो. सारखे हात काय वर्तुळाकार फिरवायला सांगतो, असा त्या मुलाचा प्रश्न असतो. कार पॉलिश हाताने करताना असेच असते.. त्यामुळे तुम्हाला एक प्रकारे व्यायामही नक्कीच मिळतो. अर्थात प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार हे सारे करावे.
सर्वात प्रथम कारचा पृष्ठभाग झाडून घेऊन त्यावर असलेली धूळ बाजूला करावी. त्यानंतर एका ओल्या फडक्याने कार पुसून घ्यावी व सुख्या फडक्याने पुन्हा ती नीट पुसून स्वच्छ करावी. त्यामुळे कारच्या पृष्ठभागावरील धूळ, बर्डशीट आदी बाबी राहाणार नाहीत, याचीही दक्षता तुम्ही घेऊ शकाल. त्यानंतर कारचा पृष्ठभाग सुका झाला बाजारातून िवकत घेतलेल्या क्रीम पॉलिश स्पंजच्या सहाय्याने कारच्या पृष्ठभागावर लावण्यास सुरुवात करावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कामासाठी पॉलिश, स्पंज, कॉटनवेस्ट किंवा कापडाचे पातळ फडके वा पंचासारखे कापड घ्यावे. सिंथेटीक कापड नको. त्यानंतर कारच्या दरवाज्याचे एकंदर चार भाग म्हणजे मागचा, पुढचा तसेच डिक्की वा बूट स्पेस, छत, बॉनेट असे विविध भाग लक्षात घेऊन त्या त्या भागाला पॉलिश स्वतंत्रपणे करायचे आहे हे लक्षात घ्यावे म्हणजे एकाचवेळी सर्व ठिकाणी पॉलिश लावण्याच्या पडू नये. त्यामुळे जास्त भागात पॉलिश लावल्यानंतर ते वाळून जाण्याची शक्यता असते. यासाठी वर दिल्यानुसार भाग लक्षात घेऊन तेथे कारच्या बाह्य पृष्ठभागावर स्पंजने पॉलिश लावून ते कॉटन वेस्ट वा पातळ फडक्याने वर्तुळाकार पद्धतीने घासत राहावे त्यावर अतिजोर आवश्यक तेव्हा द्यावा. यंत्राने पॉलिश करताना त्यावर लावलेली कापडाच्या चक्राची १८०० आरपीएम इतकी गती जास्त असते की, त्यामुळे कारचा रंगही जाण्याची शक्यता असते. हाताने मात्र पॉलिश करता तसे होत नाही. सव्र भागावर पातळ कापडाच्या सहाय्याने पॉलिशचा मुख्य टप्पा झाल्यानंतर तुम्हाला पृष्ठभागाला गुळगुळीतपणा आल्याचे व चकमकीत झाल्याचे लक्षात येईल. हातालाही जाणवेल. अर्थात त्यासाठी तुम्हाला वेळ मात्र नक्कीच द्यावा लागेल.