हनोई : जगातील सर्वच देशांच्या राजधानींना हवा प्रदुषणाने विळखा घातला आहे. दिल्लीमध्ये 2 हजार सीसीच्या कारवर बंदी आणली आहे. आता व्हिएतनाम या देशाची राजधानी हनोई येथे 2030 पासून दुचाकींवर बंदी आणण्यात येणार आहे. हनोई शहराला हवा प्रदुषणाने विळखा घातला आहे. या शहरात दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे येथील प्रशासनाने मतदान घेत खासगी वाहनांच्या वापरावर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार 2030 पासून शहरामध्ये दुचाकी वापरण्यावर बंदी आणण्यात येणार आहे. तसेच 2020 पर्यंत 2.5 दशलक्ष जुन्या दुचाकी हटविण्यात येणार आहेत. आग्नेय आशियामध्ये हनोई हे शहर सर्वात प्रदुषित म्हणून ओळखले जाते. डब्ल्यूएचओ नुसार वर्षातील केवळ 38 िदवसच येथील लोकांना चांगली हवा मिळते. हे शहर 110-125 सीसीच्या दुचाकींच्या वापरासाठी प्रसिद्ध आहे. तसेच औष्णिक वीज प्रकल्प, औद्योगिक पट्टा आणि बांधकामांमुळेही प्रदुषणात वाढ होत आहे. या शहरात दिवसाला तब्बल 5.2 दशलक्ष दुचाकी रस्त्यावर धावत असतात. 2020 पासून निम्म्या दुचाकींचा वापर बंद करतानाच 2025 ते 29 या काळात ठराविक तासांसाठी दुचाकींचा वापर बंद करण्यात येणार आहे.
या देशाच्या राजधानीमध्ये 2030 पासून होणार दुचाकी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 9:08 AM