'हार्ले-डेव्हिडसन' हे नाव ऐकलं, तरी बाईकप्रेमींचे कान टवकारतात, डोळे चमकतात आणि अंग शहारतं. या कंपनीच्या बाईक्सची शान, रुबाब काही औरच आहे. आपल्या चाहत्यांसाठी नवनवे 'शाही नजराणे' सादर करणारी हार्ले-डेव्हिडसन आता LiveWire नावाची पहिली इलेक्ट्रिक बाईक घेऊन आली आहे. या बाईकचा 'फर्स्ट लुक' आज दाखवण्यात आला. तो बाईकवेड्यांना वेड लावणाराच आहे. परंतु, ही बाईक भारतीय बाजारात दाखल व्हायला वेळ लागणार आहे.
सुरुवातीला अमेरिका, कॅनडा आणि युरोपमध्ये Harley-Davidson LiveWire लाँच केली जाईल. आंतरराष्ट्रीय बाजारात तिची किंमत २९,७९९ डॉलर्स म्हणजेच सुमारे २१ लाख रुपये असेल. भारतात तिची किंमत ४० ते ५० लाखांच्या आसपास असेल.
जबरदस्त लुकसोबतच भन्नाट वेग ही लाइव्हवायर बाईकची खासियत असेल, असं कंपनीकडून सांगण्यात येतंय. १०५ हॉर्सपॉवर क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर असलेली ही बाईक अवघ्या ३ सेकंदांत १०० ताशी किलोमीटरचा वेग गाठू शकते. ताशी १०० किमीपासून ते ताशी १२९ किमीपर्यंत पोहोचण्यास तिला १.९ सेकंद लागतील. या बाईकमध्ये इलेक्ट्रिक रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम आहे. म्हणजेच ब्रेकमधून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचाही पुनर्वापर करता येईल.
लाइव्हवायर बाईकमध्ये कॉर्निंग अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम, रियर व्हील लिफ्ट मिटिगेशन आणि स्लिप कंट्रोल यासारखी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची फीचर्स आहेत. त्यासोबतच, ४.३ इंच टीएफटी डिस्प्ले आणि ७ रायडिंग मोड्सही देण्यात आलेत.
लाइव्हवायर इलेक्ट्रिक बाईक एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर, हायवेवर ११३ किलोमीटरचं अंतर कापू शकेल, तर शहरातल्या शहरात २३५ किलोमीटरपर्यंत जाऊ शकेल. ही बाईक पूर्ण चार्ज व्हायला साधारण १२.५ तास लागतील. डीसी फास्ट चार्जर वापरल्यास हे चार्जिंग एका तासात होऊ शकेल.