नवी दिल्ली - एमजी मोटर्स या वाहन निर्माता कंपनीसाठी भारतीय बाजारातील एमजी हेक्टर हे महत्त्वपूर्ण प्रॉ़डक्ट आहे. याची तुलना महिंद्राच्या एक्सयूव्ही ७०० सोबत केली जाते. ती ५ स्टार सेफ्टीसह येते. एमजी हेक्टरची अद्याप तरी क्रॅश टेस्ट झालेली नाही. मात्र अनेकांकडून तिच्या सेफ्टीबाबत या कारचं कौतुक होत असतं. दरम्यान, हल्लीच या कारच्याअपघाताचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्यून MG Hectorची बिल्ड क्वालिटी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही एमजी हेक्टर ताशी १०० किमी वेगाने एका ट्रॅक्टरवर जाऊन आदळली. या अपघातानंतर जे दृश्य दिसलं ते पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो.
या अपघाताचे फोटो, व्हिडीओ एका युट्युबरने अपलोड केले आहेत. एमजी हेक्टर आणि ट्रॅक्टरचा हा अपघात बिहारमध्ये झाला. व्हिडीओमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार एमजी हेक्टर ज्यावेळी ट्रॅक्टरवर आदळली, तेव्हा तिचा वेग हा सुमारे १०० किमी प्रति तास एवढा होता. हा अपघात झाला तेव्हा ट्रॅक्टर चालक चुकीच्या लेनमधून चालत होता. ट्रॅक्टर चालक अचानक चुकीच्या लेनमध्ये आल्याने दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर टक्कर झाली.
अपघातामध्ये एमजी हेक्टरच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर ट्रॅक्टरच्या समोरील भागाचे दोन तुकडे झाले. दरम्यान, या अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार झाल आहे. सुदैवाने या अपघातात एमजी हेक्टरचा चालक वाचला. गाडीच्या आतील भागाचे फार नुकसान झाले नाही. तसेच अपघातावेळी तिच्यातील एअरबॅग्सही उघडल्या गेल्या. हे चित्र एमजी हेक्टरच्या दणकट बिल्ड क्वालिटीला दर्शवणारे ठरले.