भारतात सध्या वाहन उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मंदी असल्यामुळे अनेक प्रसिद्ध कंपन्यांना आपले उत्पादन बंद करावे लागत आहे. तसेच देशातल्या मोठमोठ्या कंपन्या बंद होत असताना यामाहा व हिरो या कंपनीने ई- सायकल बाजारपेठेत दाखल केली आहे.
डोंगरावर सायकल चालवणाऱ्या उत्साही लोकांसाठी यामाहा मोटार कंपनी, हीरो सायकल आणि मित्सुई कंपनी यांनी एकत्रित येऊन लेक्ट्रो ईएचएक्स 20 ई- सायकल भारतात लॅाच केली आहे. लेक्ट्रो ईएचएक्स 20 ई- सायकलमध्ये यामाहा कंपनीची इलेक्ट्रिक मोटार वापरण्यात आली असून हीरो कंपनीकडून या सायकलची निर्मिती करण्यात आली आहे.
एचएमसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंजक एम मुंजाळ यांनी सांगितले की, हिरो सायकल आणि यामाहा मोटार कंपनीने एकत्रित येऊन लेक्ट्रो ईएचएक्स २० चे अनावरण केल्याचा अभिमान आहे. तसेच अनेक ई- सायकलमध्ये मागील हब मोटारचा वापर करण्यात येतो. मात्र लेक्टरो ईएचएक्स २० ही एकमेव इलेक्ट्रिक सायकल आहे जी सेंटर मोटरद्वारे चालविली जाणार आहे. त्याचप्रमाणे या ई- सायकलीची किंमत 1 लाख 35 हजार असणार असल्याची माहिती देखील पंजक यांनी दिली आहे.
लेक्ट्रो ईएचएक्स २० ही एक पॅडल असिस्ट सायकल असून या सायकलला पॅडलिंगद्वारे किंवा इलेक्ट्रिक द्वारे चालवता येणार आहे. या ई- सायकलमध्ये ट्रिपल सेन्सर तंत्रज्ञान, टॉर्क सेन्सर, क्रॅन्क सेन्सर आणि स्पीड सेन्सरचा समावेश आहे. यामुळे सायकल जलद पॅडलिंग आणि सुधारित उर्जा प्रदान करु शकणार आहे. त्याचप्रमाणे ही ई- सायकल 3.5 तास चार्ज केल्यानंतर 60 ते 70 किलोमीटर पर्यत धावू शकणार आहे. तसेच ऑफ-रोड क्षमता हायड्रॉलिक सस्पेंशन सेटअपद्वारे पूरक असून ब्रेकिंग हार्डवेअरमध्ये दोन्ही बाजूंनी शिमॅनो हायड्रॉलिक डिस्क ब्रेक देण्यात आले आहे.