Free Electric Scooters: हीरो इलेक्ट्रीक ही देशातील आघाडीची इलेक्ट्रीक दुचाकी कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी सतत आपले ग्राहक वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. ऑगस्ट महिन्यात हीरो इलेक्ट्रीक ही देशातील पहिल्या क्रमांकाची इलेक्ट्रीक टू-व्हीलर कंपनी होती. या कालावधीत कंपनीने 10 हजारांहून अधिक इलेक्ट्रीक स्कूटर्सची विक्री केली होती. आता अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने नवीन ऑफर सुरू केली आहे. ऑफर अंतर्गत कंपनी ग्राहकांना मोफत इलेक्ट्रीक स्कूटर देत आहे. मात्र, यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागतील.
हीरो इलेक्ट्रीकची ही ऑफर केरळ या राज्यात सुरू करण्यात आली आहे. राज्यातील लोकप्रिय सण ओणम लक्षात घेऊन ही ऑफर सुरू करण्यात आली. केरळमधील कंपनीच्या प्रत्येक 100व् या ग्राहकाला एक इलेक्ट्रीक स्कूटर मोफत देण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. ही ऑफर संपूर्ण ओणम सणादरम्यान लागू राहील अशी प्रतिक्रिया कंपनीकडून देण्यात आली. ग्राहकांना ई-स्कूटरवर संपूर्ण पाच वर्षांची वॉरंटी मिळेल. यामध्ये दोन वर्षांची एक्सटेंडेड वॉरंटी समाविष्ट आहे.
सर्वाधिक स्कूटर्सची विक्रीऑगस्ट महिन्यात हीरो इलेक्ट्रीकनं सर्वाधिक स्कूटर्सची विक्री करत पहिला क्रमांक पटकावला आहे. कंपनीने गेल्या महिन्यात 10,476 स्कूटर्सची विक्री केली. हीरो इलेक्ट्रीक ही जुलै 2022 मध्ये सर्वात जास्त विक्री करणारी इलेक्ट्रीक स्कूटर कंपनी होती. दुसरीकडे, ओकिनावा दुसऱ्या क्रमांकावर आणि एथर इलेक्ट्रीक तिसऱ्या क्रमांकावर होती. एथर इलेक्ट्रीकने विक्रीत 297 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.