नवी दिल्ली : 2022 हे नवीन वर्ष येण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. येणारं नवीन वर्ष ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी चांगले ठरू शकेल, अशी वाहन निर्मात्या कंपन्यांना आशा आहे. दरम्यान, वाहन उद्योगासाठी 2021 वर्ष इतके खास नव्हते, कारण कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या विक्रीत घट पाहिली आहे. त्याचबरोबर, वाहन बनवताना लागणाऱ्या खर्चातही वाढ झाल्याने कंपन्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत हिरो मोटोकॉर्प कंपनीने (Hero MotoCorp) जानेवारीपासून आपल्या दुचाकी वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे.
किती रुपयांची वाढ होईल?हिरो मोटोकॉर्प एका निवेदनात म्हटले आहे की, 4 जानेवारीपासून कंपनी आपल्या मोटरसायकल-स्कूटरच्या एक्स-शोरूम किमती 2000 रुपयांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. मॉर्केट आणि मॉडेलनुसार ही वाढ करण्यात येणार आहे.
सहा महिन्यांत तिसर्यांदा किमतीत वाढहिरो मोटोकॉर्प गेल्या सहा महिन्यांत तिसर्यांदा आपल्या दुचाकी वाहनांच्या किमती वाढवणार आहे. यापूर्वी, कंपनीने आपल्या मोटरसायकल आणि स्कूटरच्या एक्स-शोरूम किमती 1 जुलै रोजी 3,000 रुपयांनी वाढवल्या होत्या, तर अलीकडेच, कंपनीने 20 सप्टेंबर रोजी किमतीत 3,000 रुपयांनी वाढ केली होती. ही कंपनी तिसर्यांदा दुचाकी वाहनांवर किंमती वाढवणार आहे.
इतरही कंपन्यांही वाढवणार किंमतीगेल्या वर्षभरात स्टील, अॅल्युमिनियम, तांबे आणि मौल्यवान धातूंसारख्या कच्च्या मालाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे, त्यामुळे वाहन उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे कंपन्या आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ करत आहेत. हिरो मोटोकॉर्प व्यतिरिक्त, मारुती सुझुकी इंडिया, टाटा मोटर्स, टोयोटा किर्लोस्कर मोटर, होंडा कार्स, स्कोडा, फोक्सवॅगन यासारख्या इतर अनेक कंपन्यांनी येणाऱ्या नवीन वर्षात आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत.