नवी दिल्ली: आताच्या घडीला टू-व्हीलर सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा असल्याचे पाहायला मिळत आहे. होंडापासून ते अगदी टीव्हीएसपर्यंत अनेक कंपन्याच्या दुचाकी भारतीय बाजारात धुमाकूळ घालत आहेत. यापैकी जगातील सर्वांत मोठी भारतीय कंपनी म्हणजे हिरो मोटोकॉर्प (Hero Motocorp) या कंपनीने एप्रिल महिन्यात विक्रीच्या बाबतीत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली असून, एका महिन्यात ४.१८ लाख दुचाकींची विक्री केली आहे.
हिरो कंपनीच्या अनेक प्रकारच्या दुचाकी भारतीय बाजारात उपलब्ध आहेत. हिरो मोटोकॉर्पचं भारतीय बाजारावर गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व आहे. या कंपनीने २०२२-२३ या आर्थिक वर्षात धडाक्यात सुरुवात केली आणि गेल्या एप्रिल महिन्यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ४,१८,६२२ मोटारसायकल आणि स्कूटर विकल्या आहेत.
अनेक दुचाकींचा टॉप १० मध्ये समावेश
हिरो मोटोकॉर्पने एप्रिल २०२२ मध्ये वार्षिक वाढ नोंदवली असताना, तिच्या दुचाकींची विक्री मासिक आधारावर मात्र घटली आहे. हिरो मोटोकॉर्प भारतातील कम्युटर बाईक सेगमेंटमध्ये सर्वाधिक बाईक विकते. कंपनीच्या हिरो स्प्लेंडर, एचएफ डीलक्स, पॅशन प्रो या दुचाकी गेल्या अनेक वर्षांपासून विक्रीच्या बाबतीत टॉप १० मध्ये आहेत. हिरो कंपनीने देशांतर्गत बाजारात एकूण ३,९८,४९० युनिट्सची विक्री केली आहे आणि कंपनीने २०,१३२ युनिट्सची आंतरराष्ट्रीत बाजारात निर्यात केली आहे. एप्रिल २०२१ मध्ये, हिरो मोटोकॉर्पने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात केवळ ३.७२ लाख युनिट्सची विक्री केली होती, ज्यामध्ये यावर्षी एप्रिलमध्ये १२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
दरम्यान, मासिक विक्रीबद्दल बोलायचे झाल्यास, मार्च २०२२ मध्ये हिरो मोटोकॉर्पने देशांतर्गत बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ४.५० लाख दुचाकी विकल्या होत्या. दुचाकींच्या विक्रीच्या बाबतीत हिरो मोटोकॉर्प ही भारतातील पहिल्या क्रमांकाची वाहन कंपनी आहे. आगामी काळात हिरो मोटोकॉर्प आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, या स्कूटरची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.