नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनी हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) घोषणा केली आहे की, 5 एप्रिलपासून कंपनी आपल्या मोटरसायकल आणि स्कूटरच्या किमती 2,000 रुपयांपर्यंत वाढवणार आहे. खर्चाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे दुचाकींच्या किमती वाढवणे आवश्यक असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "2,000 रुपयांपर्यंत केलेली ही वाढ मॉडेल आणि बाजारावर अवलंबून आहे." 2022-23 या आर्थिक वर्षापासून केवळ हिरो मोटोकॉर्पच नाही तर टोयाटो किर्लोस्कर मोटार, ऑडी आणि BMW व्यतिरिक्त मर्सिडिज-बेंज या कंपन्यांनीही एप्रिल 2022 पासून खर्चाचा हवाला देत वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, अलीकडेच हिरो मोटोकॉर्प कंपनीबद्दल एक अहवाल समोर आला आहे, ज्यात दावा करण्यात आला आहे की कंपनीने केलेला 1,000 कोटी रुपयांचा खर्च बोगस असल्याचे आढळून आले आहे, त्यामुळेच शेअरची किंमत 7 टक्क्यांनी घसरली आहे. न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, 23 मार्च रोजी आयकर विभागाने हिरो मोटोकॉर्प आणि कंपनी अध्यक्ष व एमडी पवन मुंजाल यांच्या दिल्ली-एनसीआरमधील अनेक ठिकाणांवर छापे टाकले, जे 26 मार्च रोजी संपले. दिल्लीच्या आसपास 40 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. डिजिटल आणि हार्डकॉपीमध्ये मोठ्या प्रमाणात पुरावे जप्त करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.
1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त हेराफेरीचा अंदाजअहवालानुसार, या पुराव्यांमध्ये कंपनीने मोठ्या प्रमाणात फसवी खरेदी दाखवली आहे, खात्यात जमा न करता मोठी रक्कम खर्च केल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणात एक हजार कोटींहून अधिक रुपयांची हेराफेरी झाल्याचा अंदाज आहे. दिल्लीजवळ 100 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे फार्महाऊस रोखीने खरेदी केल्याचा पुरावाही आयकर विभागाला मिळाला आहे. मुंजाल यांनी छतरपूरमध्ये फार्महाऊस खरेदी केले आहे, ज्याच्या किंमतीत कर वाचवण्यासाठी बदल करण्यात आला आहे आणि ते खरेदी करण्यासाठी काळ्या पैशाचा वापर करण्यात आला आहे.