Hindustan Motors Electric Two Wheelers: अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत तेजी पाहायला मिळत आहे आहे. दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांची विक्रीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्राहकांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांची मागणी पाहता अनेक कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आहेत. यात आता प्रसिद्ध 'अॅम्बेसेडर' कार बनवणारी कंपनी हिंदुस्तान मोटर्स पुढच्या वर्षी इलेक्ट्रिक टू-व्हीलर आणण्याच्या तयारीत आहे.
कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हिंदुस्तान मोटर्स एका युरोपियन कंपनीसोबत भागीदारी करुन इलेक्ट्रिक टू-व्हीलर लॉन्च करण्याचा विचारात आहे. कंपनी आगामी काळात इलेक्ट्रिक चारचाकी वाहनेही बनवू शकते, अशी शक्यता आहे. हिंदुस्थान मोटर्सचे संचालक उत्तम बोस यांच्या मते, दोन्ही कंपन्यांचे आर्थिक लेखापरीक्षण जुलैमध्ये सुरू होईल. त्यानंतर संयुक्त उपक्रमाच्या तांत्रिक बाबींचाही विचार केला जाईल. यासाठी पुढील काही महिने लागू शकतात.
बोस पुढे म्हणाले की, नवीन युनिटच्या स्थापनेनंतर प्रकल्पाच्या प्रायोगिक चाचण्या सुरू करण्यासाठी आणखी दोन तिमाहींची आवश्यकता असेल. यासोबतच त्यांनी असेही सांगितले की, पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस अंतिम उत्पादन सादर केले जाण्याची शक्यता आहे. "दुचाकी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांनी चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीबाबत निर्णय घेतला जाईल."