नवी दिल्ली : पाचवी जनरेशन होंडा सिटीने कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटला बाजारात येताच एका वेगळ्या पातळीवर आणले आहे. ही कार जबरदस्त फीचर्स आणि शानदार स्टायलिंगसह लॉन्च करण्यात आली आहे. आता कंपनीने भारतात नवीन जनरेशन सिटीचे हायब्रीड मॉडेल लॉन्च करण्याची तयारी जवळपास पूर्ण केली आहे.
या कारला होंडाची आय-एमएमडी ईएचईव्ही हायब्रिड सिस्टीम दिली जाईल, जी दोन इलेक्ट्रिक मोटर्ससह येते. या सिस्टिममुळे नवीन होंडा सिटी देखील केवळ इलेक्ट्रिक पॉवरवर चालविली जाऊ शकते. टोयोटा कॅमरीला मागे टाकत ती भारतात विकली जाणारी सर्वात स्वस्त सेल्फ-चार्जिंग हायब्रिड कार बनणार आहे.
होंडा सिटीच्या नवीन हायब्रीड व्हेरिएंटला 1.5 लीटर पेट्रोल इंजिन दिले जाईल, जे 98 पीएस पॉवर आणि 127 एनएम पीक टॉर्क बनवते. हायब्रीड सिस्टीममुळे नवीन कार वेगवान तर होईलच, पण तिचे मायलेजही प्रचंड वाढेल. कारमधील इलेक्ट्रिक मोटर 109 पीएस पॉवर आणि 253 एनएम पीक टॉर्क बनवते.
कारचे इंजिन सीव्हीटी ऑटोमॅटिक गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. होंडा इंडियाने नवीन सिटी हायब्रीडला तीन मोड्स दिले आहेत ज्यात प्युअर ईव्ही, हायब्रीड आणि इंजिन समाविष्ट आहे. दरम्यान, हायब्रीड सिस्टम बसवल्यानंतर कारचे मायलेज 27.78 किमी/लीटर होते.
अंदाजे किती असेल किंमत?होंडा ही कार भारतीय बाजारपेठेत स्पर्धात्मक किमतीत लॉन्च करणार आहे. कॉम्पॅक्ट सेडान आता बाजारात खूपच कमी किमतीत उपलब्ध आहेत आणि हायब्रीड पद्धतीमुळे त्याची किंमत नक्कीच वाढणार आहे. अशा परिस्थितीत होंडा सिटी हायब्रीडला 17.5 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च केला जाऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. होंडाच्या सध्याच्या पेट्रोल व्हेरिएंटची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11.23 लाख रुपये आहे, जी टॉप मॉडेलसाठी 15.18 लाख रुपयांपर्यंत जाते.