ग्लोबल एनकॅपमध्ये होंडाला जबर धक्का बसला आहे. २०१९ मध्ये सेफ्टी रेटिंगमध्ये ४ स्टार घेऊन येणारी कार २०२४ मध्ये फक्त दोन स्टार घेऊन आली आहे. लहान मुलांच्या सेफ्टीमध्ये तर होंडा अमेझला झिरो स्टार मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी GNCAP ने महिंद्रा बोलेरो निओ आणि होंडा अमेझची सेफ्टी रेटिंग जाहीर केली होती.
भारत एनकॅप सुरु झालेले असले तरी ग्लोबल एनकॅपमध्ये कंपन्या आपल्या कार पाठवत आहेत. या GNCAP चे निकाल आले आहेत. चाईल्ड आणि अडल्ट सेफ्टीमध्ये महिंद्राच्या बोलेरो निओला १ स्टार मिळाला आहे. तर होंडाच्या अमेझला दोन स्टार मिळाले आहेत.
होंडाच्या या कारला पुढून धक्का मिळाल्यास डोके आणि मानेला चांगली सुरक्षा मिळाली आहे. तसेच छातीलाही चांगली सुरक्षा मिळत आहे. परंतु पुढे बसलेल्या दोन्ही पॅसेंजरच्या गुढघ्याला खूप कमी सुरक्षा मिळत आहे. यामुळे या ठिकाणी दोन स्टार देण्यात आले आहेत.
लहान मुलांच्या बाबतीत ही कार फेल गेली आहे. आयसोफिक्स सीटवर बसलेल्या डमीच्या डोक्याला जास्त मार लागलेला दिसला नसला तरी त्याचे डोके गाडीच्या भागांवर आदळल्याचे समोर आले आहे. हे तीन वर्षांच्या डमी मुलासोबत घडले तर १८ महिन्यांच्या मुलाला पुरेशी सुरक्षा देण्यात ही कार अयशस्वी ठरली. ही टेस्ट ६४ किमी प्रती तास या वेगाने घेण्यात आली होती. यात होंडा अमेझला ४९ पैकी ८.५८ पॉईंट देण्यात आले. यामुळे या कारला झिरो स्टार मिळाला आहे. साईड इम्पॅक्ट टेस्टमध्ये लहान मुलांना चांगली सुरक्षा मिळाली आहे.