कर्मचाऱ्यांना त्यांच्या कष्टाचे चीज म्हणून एखादी कंपनी बोनस देते, तेव्हा पगार झाल्याच्या आनंदापेक्षाही तो कर्मचारी खूश असतो. त्याचा फायदा त्या कंपनीलाच होतो, कारण हा कर्मचारी आणखी जोमाने काम करू लागतो. परंतू, होंडा या जगप्रसिद्ध जपानी कंपनीने आधी कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी बोनस वाटला, आता परत मागत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Honda Motor ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना जादा बोनस दिल्याचे कारण सांगून तो परत मागत आहे. होंडा कार कंपनीने मॅरिसविले, ओहियोच्या प्लांटमधील कर्मचाऱ्यांना थेट मेमोच पाठविला आहे. यामध्ये कंपनीने तुम्हाला बोनस रकमेपेक्षा जास्तीचा बोनस दिला आहे. तो कंपनीला परत करावा असे यात म्हटले आहे. यामुळे आनंदी असलेले कर्मचारी कंपनीच्या या कृत्यावर प्रचंड नाराज आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार जर कर्मचाऱ्यांनी या मेमोला प्रतिसाद दिला नाही, तर त्यांच्या पगारातून ही रक्कम कापली जाणार असल्याचे मेमोमध्ये म्हटले आहे.
कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांकडे कायदेशीररित्या बोनसची रक्कम परत मागितल्याचे म्हटले आहे. परंतू, कर्मचाऱ्यांना किती बोनस दिला गेला, आणि किती परत मागितला यावर कंपनीने भाष्य केलेले नाही. "या महिन्याच्या सुरुवातीला, होंडाने आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस दिला होता, त्यापैकी काहींना जास्त पैसे दिले गेले होते. नुकसानभरपाईशी संबंधित समस्या ही संवेदनशील बाब आहे आणि आम्ही आमच्या भागीदारांवर होणारा कोणताही संभाव्य परिणाम कमी करण्यासाठी वचनबद्ध आहोत," असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.
एका कर्मचाऱ्याच्या पत्नीने होंडाने बोनसच्या रकमेपैकी १० टक्के रक्कम परत मागितल्याचा दावा केला आहे. परत करावयाची रक्कम खूप जास्त आहे, असे ती म्हणाली.