नवी दिल्ली : दिग्गज दुचाकी कंपनी होंडा मोटारसायकल अँड स्कूटर्सने (Honda Motorcycle and Scooters) भारतीय बाजारपेठेत आपली सर्वात स्वस्त बाईक मोठ्या धमाक्यात लॉन्च केली आहे. हिरो स्प्लेंडरला (Hero Splendor) टक्कर देण्यासाठी कंपनीने होंडा शाइन 100 (Honda Shine 100) नावाची आपली 100 सीसी बाईक लॉन्च केली. कंपनीने या बाईकची किंमत 65 हजार रुपयांपेक्षा कमी ठेवली आहे. कंपनीची ही बाईक 5 कलर ऑप्शनमध्ये मिळणार आहे. कंपनीने बाईकची सुरुवातीची किंमत 64,900 रुपये (एक्स-शोरूम, महाराष्ट्र) ठेवली आहे.
या होंडा बाईकचे परफॉर्मन्स नंबर स्प्लेंडर प्लसच्या जवळपास आहेत. यामध्ये 97.2 सीसी, एअर-कूल्ड, सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे, जे 8 Bhp पॉवर आणि 8.05 Nm पीक टॉर्क निर्माण करते. हे 4-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. स्प्लेंडर व्यतिरिक्त, होंडाची नवीन 100 सीसी बाईक एचएफ डिलक्स, एचएफ 100 आणि बजाज प्लॅटिना 100 ला देखील टक्कर देईल. सुरक्षेचा विचार करून, साइड स्टँड लावले असता इंजिन स्टार्ट होणार नाही. आपल्या नवीन 100 सीसी शाईनसह, होंडा ग्रामीण बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करत आहे.
होंडा नवीन शाइन 100 सीसीसह, कंपनी या सेगमेंटमध्ये बेस्ट मायलेज देण्याचा दावा करत आहे. होंडा शाइन 100 वर 6 वर्षांचे विशेष वॉरंटी पॅकेज (3 वर्षे सँडर्ड + 3 वर्षे ऑप्शन एक्सटेंडेड वॉरंटी) देखील दिले जात आहे. डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये आकर्षक फ्रंट काउल, ऑल ब्लॅक अलॉय व्हील्स, प्रॅक्टिकल अॅल्युमिनियम ग्रॅब रेल, बोल्ड टेल लॅम्प मिळतात. तसेच, नवीन होंडा शाइन 100 ची लांबी 677 मिमी आणि सीटची उंची 786 मिमी आहे.
आजपासून बाईकचे बुकिंग सुरू झाले आहे. बाईकचे प्रोडक्शन पुढील महिन्यापासून सुरू होईल, तर मे 2023 पासून डिलिव्हरी सुरू होईल. भारतातील एकूण बाईक विक्रीपैकी 100 सीसी बाईक सेगमेंटची हिस्सेदारी 33 ट्क्के आहे. या 33 टक्क्याचा एक मोठा भाग हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) कडे आहे. स्प्लेंडरची मासिक विक्री जवळपास 2.5 लाख युनिट्स आहे. आतापर्यंत होंडा या सेगमेंटमध्ये अस्तित्वात नव्हती. पण आता स्पर्धा वाढणार आहे.