नवी दिल्ली : आगामी रिअल ड्रायव्हिंग एमिशन (RDE) नॉर्म्स लक्षात घेऊन, कार उत्पादक कंपन्या भारतातील डिझेल इंजिन मॉडेल्स बंद करण्याचा विचार करत आहेत. या कंपन्यांमध्ये जपानी कार निर्माता कंपनी होंडा (Honda) सुद्धा आहे, जी पुढील वर्षाच्या फेब्रुवारीपासून होंडा सिटी (Honda City) आणि होंडा अमेज सेडानच्या (Honda Amaze sedans) डिझेल इंजिन ऑप्शनला टप्प्याटप्याने बंद करण्याचा विचार करत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिझेल इंजिन आगामी RDE नॉर्म्स पूर्ण करू शकत नाहीत, असे होंडा कार्स इंडियाचे सीईओ ताकुया त्सुमुरा यांनी सांगितले. तसेच, मीडिया रिपोर्ट्सनुसार, होंडा आपले 1.5-लिटर डिझेल इंजिन बंद करेल, जे होंडा सिटी, अमेज आणि डब्ल्यूआर-व्हीमध्ये मिळते. दरम्यान, होंडाने डब्ल्यूआर-व्ही, जॅझ आणि अमेजच्या निवडक डिझेल व्हेरिएंटसाठी ऑर्डर घेणे देखील बंद केले आहे.
अनेक ब्रँड्सनी डिझेल इंजिन केले बंदजागतिक स्तरावरही अनेक ब्रँड्सनी डिझेल इंजिन बंद केले आहेत. याचबरोबर, भारतीय कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आधीच डिझेल इंजिनपासून स्वतःला दूर केले आहे. मारुती फक्त पेट्रोल इंजिन असलेल्या कारची विक्री करत आहे. दरम्यान, पेट्रोल इंजिनसह मायलेज आणि रनिंग कॉस्ट लक्षात घेऊन मारुती सुझुकीकडून सीएनजी आणि स्ट्राँग हायब्रीड टेक्नॉलॉजी ऑफर करण्यात येत आहे.
मारुतीकडून हायब्रीड टेक्नॉलॉजी आणि सीएनजी कारची विक्रीमारुतीने नुकत्याच लाँच केलेल्या ग्रँड विटारामध्ये टोयोटाकडून घेतलेल्या स्ट्राँग हायब्रीड टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. याचबरोबर, कंपनीकडे सीएनजी कारचा मोठा पोर्टफोलिओ देखील आहे. कंपनी 10 हून अधिक सीएनजी कार विकते.