वैयक्तिक वापराची कार ही अनेकांचा तसा जीव की प्राण असते. त्या कारमध्ये विविध साधने आणून त्याने ती सजवणारे लोकही अनेक आहेत. पण एक लक्षात घ्या काही झाले तरी त्या कारने तुम्ही जेव्हा प्रवास करता तेव्हा अनेक प्रकारचे अनुभव तुम्ही घेत असता. हे अनुभव तुम्हाला नक्कीच आनंद वा क्लेशदायी असू शकतात. पण सर्व अनुभवांचा तुम्हाला नेहमीच भविष्यकाळात या ना त्या प्रकारे उपयोग होत असतो.
पूर्वी लोक दैनंदिनी (डायरी)लिहित, रोज रात्री त्या दैनंदिनीच्या पानावर दिवसभरात झालेल्या घटनांची आपल्या अनुभवांची नोंद असे. ती एक चांगली सवय होती. आजही जुन्या लोकांच्या डायऱ्या नजरेस पडतात तेव्हा त्यावेळच्या वस्तूंच्या किंमती, त्या लोकांचे खर्च वाचले की आश्चर्य वाटते. इतक्या कमी पैशात ते लोक कसे काय संसार करीत, असे वाटते. त्या लोकांचे अनुभव वाचूनही थक्क व्हायला होते. आज मोबाईल व संगणकाच्या युगातही खरे म्हणजे लिहिण्यासाठी अनेक माध्यमे मिळालेली आहेत. त्याचा वापरही कराच. पण कारमध्ये असलेल्या या साध्या सुध्या वहीमध्ये वा छानच्या नोटबुकमध्ये तुमच्या कारच्या दिनक्रमाचा तपशील नोंदवा. तो नक्कीच उपयोगीही पडेल.
डायरीच्या सुरुवातीच्या एक- दोन पानावर तुमचे नाव, कारच्या विकत घेतल्याची तारीख,त्या कारचे सर्व तपशील त्याच्यात नोंद करा. म्हणजे कारचा आरटीओ क्रमांक, आरसी बुकमध्ये असलेली सर्व नोंद, तसेच कारमध्ये असलेल्या बॅटरीची तारीख, वॉरंटी कालावधीची मुदत, अन्य काही सामग्रीबाबत अशा प्रकारे असणारी माहिती, कारचा विमा सुरू झाल्याची तारीख, व संपणार ती तारीख, पीयूसी कधी काढला, कधी संपणार ती तारीख. अशा प्रकारच्या या नोंदींनर प्रत्येक प्रवासाच्या नोंदी करण्यास सुरुवात करा. पानावर एकेका ओळीचा सलग वापर त्यावर करा. त्यामध्ये प्रथम तुमच्या कारचे रनिंग सुरुवात झाल्याची नोंद ओडोमीटरवरून करा. त्यानंतर प्रवासाची तारीख, पेट्रोल, डिझेल वा इंधन भरल्याची तारीख,ते किती भरले, ते कुठे भरले, वेळ काय होती हे नोंद करा. पेट्रोलची किंमतही नोंद करा. इंधन भरताना प्रत्येकवेळी ट्रीप मीटर शून्य करा, (त्यानंतर पुढील इंधन भरताना ट्रीप मीटरमध्ये एकंदर किती रनिंग झाले व किती इंधन भरले ते पाहून मायलेजही तुम्हाला समजू शकेल. प्रत्येकवेळी इंधन भरताना ट्रीप मीटर शून्य करा) एका ठिकाणाहून निघाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी पोहोचल्याचीही नोंद त्यात ठेवा. या सर्वांमुळे तुम्हाला एखादा प्रवास किती केला, तो कधी केला, त्यात पेट्रोलपंप कुठे होते. रस्त्यांचे टप्पेनिहाय अंतर किती आहे हे देखील त्यामुळे कळू शकेल.
केवळ शहरांमध्ये अंतर्गत प्रवास करताना वा प्रामुख्याने शहरातच वापर ज्यांचा जास्त आहे,अशांनी इंधन भरण्यापासून नंतर इंधन भरेपर्यंत अशा टप्प्यांमध्ये नोंद ठेवा. कारण कमी अंतर जाण्या, येण्यातून तुमचा कदाचित जास्त वेळ व गोंधळही उडू शकतो. त्यामुळे तेथे प्रत्येक प्रवासनिहाय नोंद ठेवण्याची गरज नाही.
स्वतःच्या कारने लांबवर प्रवास करण्याची आवड असणाऱ्यांनी हा सर्व डायरीचा प्रकार लक्षात घेऊन त्यात अन्य अनेक विशेष बाबी नोंद करून ठेवाव्यात. पंक्चर झाली, काही पार्ट बदलला तर त्याची नोंद, टिप्पण आदींमुळे तुम्हाला या साऱ्या घटनांमधील अनुभवही लक्षात राहातील. यासाठी मोबाईलचाही वापर तुम्ही करू शकता. लांबच्या मस्त प्रवासांमध्ये तर तुम्ही तुमच्या संगणक वा मोबाईलच्या आधारे त्या त्या प्रवासांमधील फोटोही टाकून सेव्ह करू शकता. ती गंम्मतही तुमच्या आयुष्यातील भूतकाळांमधील आठवणींना भविष्यात उजाळा देणारी ठरू शकते.